गणेश विसर्जनासाठी तयारी
By admin | Published: September 12, 2016 02:02 AM2016-09-12T02:02:52+5:302016-09-12T02:02:52+5:30
५ सप्टेंबरपासून गडचिरोली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे.
प्रशासन सज्ज : तलाव पात्रात खोलवर उभारले कठडे
गडचिरोली : ५ सप्टेंबरपासून गडचिरोली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. रविवारपासून सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे विसर्जनाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. गोकुलनगर लगतच्या तलाव परिसरात पाळीवर न.प. प्रशासनाने विद्युतीकरण केले आहे. याशिवाय कामगारांमार्फत दररोज निर्माल्य जमा करून पायऱ्यांची स्वच्छता ठेवली जात आहे. विशेष म्हणजे, पालिका प्रशासनाने यंदा प्रथमच तलाव पात्रात बुडून प्राणहानी होऊ नये, यासाठी १५ फूट खोलपर्यंत लाकडी खांब उभे करून पायरीच्या परिसरात कठडे तयार केले आहे. या कठड्याच्या आत मूर्तींचे विसर्जन करण्याच्या सूचनाही मंडळांना देण्यात आल्या आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
दीडशेवर पोलीस, गृहरक्षक राहणार
गडचिरोली शहरातील सार्वजनिक गणेशमूर्तींचे मंडळांमार्फत गोकुलनगर तलावाच्या पात्रात विसर्जन केले जाते. सदर विसर्जन काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी गडचिरोली पोलीस ठाण्याच्या वतीने मनुष्यबळाचे योग्य प्रमाणात नियोजन करण्यात आले आहेत. प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी एक ते दोन गृहरक्षक तैनात करण्यात आले आहेत. १३ ते १५ सप्टेंबरदरम्यान मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तीचे विर्सजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर २० महिला व ८० पुरूष अशा एकूण १०० गृहरक्षक तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय १० पोलीस अधिकाऱ्यांसह जवळपास ८० पोलीस कर्मचारी सुरक्षेची भूमिका पार पाडणार आहेत, असे ठाणेदार विजय पुराणिक यांनी सांगितले.