राष्ट्रीय महामार्गाच्या उद्घाटन सभेची तयारी जोमात
By Admin | Published: December 26, 2016 01:29 AM2016-12-26T01:29:56+5:302016-12-26T01:29:56+5:30
गडचिरोली या नक्षलग्रस्त भागात दळणवळण वाढविण्याच्या दृष्टिकोनातून उत्तम दर्जाचे रस्ते निर्माण
शुक्रवारी सोहळा : राज्यपाल, मुख्यमंत्री गडचिरोलीत येणार, शामियाना उभारण्याच्या कामास प्रारंभ
गडचिरोली : गडचिरोली या नक्षलग्रस्त भागात दळणवळण वाढविण्याच्या दृष्टिकोनातून उत्तम दर्जाचे रस्ते निर्माण करण्याचे काम केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने हाती घेतले आहे. याअंतर्गत नक्षलग्रस्त गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातून सात राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. या महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन ३० डिसेंबर २०१६ रोजी केले जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी राज्यपाल डॉ. सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. या भूमिपूजन कार्यक्रमाची सभा शुक्रवारी धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे. यासाठी महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रशस्त शामियाना उभारण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे.
गडचिरोली या नक्षलग्रस्त भागात रस्ते विकास योजना २००१-२०२१ राबविली जात आहे. याअंतर्गत केंद्र सरकारचे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय रस्ते निर्मितीचे काम करणार आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन करण्याच्या निमित्ताने सिरोंचा व तेलंगणा राज्याला जाणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाचे लोकार्पणही सिरोंचा येथे होणार आहे. त्यानंतर गडचिरोली येथे दुपारी जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेला सर्व मान्यवर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी गुरूवारी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत दिली होती.
राज्यपाल व मुख्यमंत्र्यांची सभा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग कार्यालय व जिल्हा प्रशासन लागले आहे. रविवारी शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात एका खासगी डेकोरेशनचे मजूर लाकडी खांब गाडण्याचे काम करीत असल्याचे दिसून आले. सभेचा स्टेज भव्य, दिव्य राहणार असून या कामात अनेक मजूर भिडले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
जिल्ह्यातून असे जातील महामार्ग
गडचिरोली जिल्ह्यातून तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरून आदिलाबाद-कोरपना-गडचांदूर-राजुरा-बामणी-गोंडपिपरी-आष्टी-आलापल्ली-हेमलकसा-भामरागड ते महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेपर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्र. १६ तसेच आलापल्लीपासून अहेरी याशिवाय राष्ट्रीय महामार्ग १७-सी अंतर्गत ब्रम्हपुरी-वडसा-कुरखेडा-कोरची-देवरी-आमगाव- गोंदिया व राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी अंतर्गत साकोली-लाखांदूर-वडसा-आरमोरी-चामोर्शी-आष्टी-आलापल्ली-रेपनपल्ली-सिरोंचा (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६) ला जोडणार. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० करंजी-वणी-वरोरा-चंद्रपूर-मूल-सावली-गडचिरोली-धानोरा-मुरूमगाव ते छत्तीसगड असा हा राष्ट्रीय महामार्ग गडचिरोली-चिमूर या नक्षलग्रस्त भागातून जाणार आहे.