शालेय अभ्यासासह स्पर्धा परीक्षेची तयारी करा
By Admin | Published: March 24, 2017 01:12 AM2017-03-24T01:12:15+5:302017-03-24T01:12:15+5:30
शालेय अभ्यास करीत असतानाच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी, यासाठी जिद्द व चिकाटी बाळगावी,
किरण अवचर यांचे आवाहन : चामोर्शीत स्नेहसंमेलन
चामोर्शी : शालेय अभ्यास करीत असतानाच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी, यासाठी जिद्द व चिकाटी बाळगावी, असे प्रतिपादन चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी केले.
स्थानिक केवळराम हरडे कृषी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन- २०१७ ‘कृषीरंग’ कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एच. पी. बनपूरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून पी. आर. धोंडणे, मंडळ कृषी अधिकारी एच. पी. नगराळे, डॉ. दिनेश सुरजे, क्रीडा प्रमुख तुषार पाकवार, सांस्कृतिक प्रमुख छबील दुधबळे, विद्यार्थी प्रतिनिधी मोहनदास शेंडे उपस्थित होते. स्नेहसंमेलन म्हणजे, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणारे व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन वन परिक्षेत्राधिकारी धोंडणे यांनी केले. डॉ. एच. पी. बनपूरकर यांनी स्नेहसंमेलनाचे महत्त्व विशद केले. यावेळी नगराळे, डॉ. सुरजे यांनीही मार्गदर्शन केले. २० ते २३ मार्च रोजी विविध सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे बक्षीस वितरण २२ मार्चला करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी यशोदीप संस्थेच्या सदस्य तथा इंडियन पब्लिक स्कूलच्या उपप्राचार्य स्नेहा हरडे, प्राचार्य डॉ. डी. सिद्धार्थ उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठताना अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न करावे, असे आवाहन स्नेहा हरडे यांनी केले. दरम्यान विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन स्नेहा जनबंधू तर आभार हर्षाली भांडेकर हिने मानले. समारोपीय कार्यक्रमाचे संचालन धनंजय ठिकरे, मधुगंधा जुलने, प्रतीक्षा मेश्राम, प्रियंका वासनीक तर आभार अनिकेत झाडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. सरदारे, प्रा. कुमरे, प्रा. कमलेश चांदेवार, प्रा. विनोद वरखडे, प्रा. नामदेव धुर्वे, कर्मचारी श्याम भैसारे, देवराव ठाकरे, भरणे, अनिल घोंगडे, राहूल मानकर, सूरज बावणे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)