औषध वितरणासाठी कोकडी सज्ज
By admin | Published: June 8, 2017 01:46 AM2017-06-08T01:46:53+5:302017-06-08T01:46:53+5:30
तालुक्यातील कोकडी येथील वैद्यराज प्रल्हाद कावळे यांच्या मागील ३५ वर्षापासून अविरत सुरू असलेल्या उपक्रमातून दिल्या जाणाऱ्या
आज लाखावर लोक येणार : दमा आजारावर देणार मोफत औषधी
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : तालुक्यातील कोकडी येथील वैद्यराज प्रल्हाद कावळे यांच्या मागील ३५ वर्षापासून अविरत सुरू असलेल्या उपक्रमातून दिल्या जाणाऱ्या नि:शुल्क दमा औषधीचे वितरण ८ जून रोजी गुरूवारला मृग नक्षत्राच्या पर्वावर होणार आहे. वैद्यराज प्रल्हाद कावळे हे विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या दमा रूग्णांना मासोळीतून औषध देणार आहेत. सदर औषध घेण्यासाठी दमा रूग्णांची कोकडी येथे प्रचंड गर्दी होणार आहे.
मृग नक्षत्राच्या दिवशी सकाळी औषध वितरणाला सुरुवात होणार असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत औषधी वितरण होईल. याचा लाभ घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून दमा रुग्णांचे जत्थे कोकडी येथे डेरेदाखल झाले असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथील वैद्यराज प्रल्हाद कावळे सेवाभावी वृत्तीतून मागील ३५ वर्षांपासून नि:शुल्क औषधी वितरण करीत आहेत. देशासह लगतच्या नेपाळ, बांग्लादेशातून येणाऱ्या दमा रुग्णांना झालेल्या फायद्याचा अनुभव लक्षात घेता औषधीचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्यांच्या संख्येत दरवर्षी हजारोंच्या संख्येत भर पडत आहे. यामुळे कोकडी या गावाला कुंभमेळ्याचे स्वरुप प्राप्त होत असते. एकूणच दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता औषधीवाटपा दरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये, यास्तव तालुक्यातील सेवाभावी संस्था,दानशूर व्यक्ती तद्वतच समस्त गावकऱ्यांच्या वतीने आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
देसाईगंज ते कोकडी अशा ८ किमी प्रवासादरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये करिता एस.टी.बसेस, आॅटो, खाजगी ट्रॅव्हल्सची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. लांबवरून आलेल्या रुग्णांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. शाकाहारी रुग्णांना केळीच्या माध्यमातून तर मांसाहारी दमा रुग्णांना गणी भुरभुसा या बारीक मासोळ्यांतून आयुर्वेदिक औषध दिली जाते. ही औषध सतत तीन वर्षातून एकदाच सेवन केल्याने रुग्णांना कायम स्वरुपी लाभ मिळत असल्याचे सांगण्यात येत असल्याने या औषधीचा लाभ घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यासह विदेशी रुग्णही कोकडीकडे वळू लागल्याने दरवर्षी येणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मासोळीतून औषध देताना मासोळ्यांचा तुटवडा जाणवू नये याकरिता स्थानिक भोई, ढिवर, केवट समाज बांधवांसह परिसरातील बांधवांचे विषेश सहकार्य घेण्यात येते. उन्हाचा तडाखा लक्षात घेता तालुका आरोग्य विभागाच्या वतीने अकस्मात सेवा तत्पर ठेवण्यात आली असून पोलीस यंत्रणाही सुसज्ज आहे.