अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावरून भाजप, काँग्रेसमध्ये घमासान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2017 01:57 AM2017-03-19T01:57:52+5:302017-03-19T01:57:52+5:30
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला मतदारांचा कौल मिळाला आहे.
२१ ला जि.प.मध्ये निवडणूक : काँग्रेसच्या खेम्यात २५ सदस्य असल्याचा दावा; भाजपचीही मोर्चेबांधणी
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला मतदारांचा कौल मिळाला आहे. त्यानुसार भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला याकरिता राखीव आहे. त्यामुळे या पदाकरिता भारतीय जनता पक्षात तीन प्रमुख महिला दावेदार असल्याचे दिसून येत आहे. तर काँग्रेसला १५ जागा मिळाल्या असून आविसं, ग्रामसभा उमेदवार व अपक्षांच्या मदतीने काँग्रेसनेही २५ चे संख्याबळ पूर्ण केले असल्याचा दावा पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. आम्हाला बहुमतासाठी एका सदस्याची गरज असून वेळेवर काहीही होऊ शकते, असे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या समिकरणात काँग्रेस ऐनवेळी अध्यक्ष पदावर कुणाला उभे करते, हे ही महत्त्वाचे राहणार आहे.
भारतीय जनता पक्षाला २० जागांवर यश मिळाले असले तरी या २० जागांमध्ये १३ महिला विजयी झालेल्या आहेत. यामध्ये देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, कुरखेडा, धानोरा, मुलचेरा, एटापल्ली, अहेरी, सिरोंचा या तालुक्यात प्रत्येकी एक महिला भाजपच्या तिकीटावर निवडून आली आहे. तर चामोर्शी तालुक्यात चार महिला निवडून आल्या आहेत. चामोर्शी तालुका हा गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. येथे नऊ पैकी सहा जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आहे. या भागातील ओबीसी समाजात मोडणाऱ्या तेली व कुणबी समाजाला प्रतिनिधीत्व देण्याच्या दृष्टीने भाजप अध्यक्ष पदाची रणनिती तयार करू शकते, असे राजकीय जाणकार मानतात. शिवाय २०१९ पूर्वी गडचिरोली विधानसभा क्षेत्राची पोटनिवडणूक आल्यास भाजपला कुठलाही दगा फटका होऊ नये या दृष्टीकोणातूनही चामोर्शी तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या रूपाने प्रतिनिधीत्व दिले जाऊ शकते. त्यामुळे या तालुक्यातून निवडून आलेल्या विद्या हिंमतराव आभारे व योगीता मधुकर भांडेकर या अध्यक्ष पदाच्या दावेदार उमेदवार असू शकतात.
त्याच बरोबर आरमोरी विधानसभा क्षेत्रातून भाजपला पहिल्यांदाच नऊ सदस्य जिल्हा परिषदेवर निवडून आणता आले. यामागे आमदार क्रिष्णा गजबे, ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, प्रकाश पोरेड्डीवार यांचेही परिश्रम कामी आले. त्यामुळे आरमोरी विधानसभा क्षेत्रात अध्यक्ष पद द्यावयाचे झाल्यास देसाईगंज तालुक्यातून निवडून आलेल्या रोशनी सुनिल पारधी यांच्या नावाचाही विचार अध्यक्ष पदासाठी केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. चामोर्शी ही सर्वात मोठी पंचायत समिती आहे. या पंचायत समितीवर सभापती पदी तेली समाजाचे आनंद भांडेकर यांची वर्णी लावण्यात आली. त्यामुळे आता जिल्हा परिषदेत विद्या आभारे यांच्या नावाचे पारडे जड होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे या सर्वांना चालणारा चेहरा व बहुजन समाजालाही न्याय देता येईल, असे सोशल इंजिनिअरींग अध्यक्ष पदाच्या रूपाने भाजप तयार करणार असल्याचे बोलले जात आहे.
भाजपच्या वाट्याला राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी झाल्याने केवळ तीन पद येणार आहेत. यामध्ये अध्यक्ष पद व दोन सभापती पदांचा समावेश आहे. भाजप, राकाँच्या आघाडीला पाठींबा देणाऱ्या अपक्ष जि.प. महिला सदस्यालाही पद द्यावे लागणार आहे. त्यामुळे भाजपचे नेते या सर्व बाबीवर कसा तोडगा काढतात, हे येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल. १९ किंवा २० तारखेला भाजपची नेता निवडीची बैठक होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस पक्षाकडून नागपूर येथे शनिवारी सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती आहे. काँग्रेसकडून रूपाली पंदिलवार व मनिषा दोनाडकर या दोन अध्यक्ष पदाच्या प्रमुख दावेदार आहेत. तर आविसंला उपाध्यक्ष पद दिले जाऊ शकते. काँग्रेससोबत अतुल गण्यारपवार हे ही असल्याने काँग्रेसला मोठी आशा आहे. याशिवाय सभापती पदासाठीही जोरदार मोर्चेबांधणी काँग्रेसने चालविली आहे. भाजपात खासदारांच्या गटाला आविसं आपल्यासोबत असावी, असे वाटते. मात्र पालकमंत्र्यांचा या बाबीला सक्त विरोध असल्याने भाजपला या निवडणुकीत दगा फटका होऊ नये याची काळजी घ्यावी लागणार आहे. अन्यथा भाजपच्या हातून सत्ता सुटून जाऊ शकते, असे पक्षातील काही जणांचे म्हणणे आहे.(जिल्हा प्रतिनिधी)