तेलंगणा प्रशासनाकडून गर्भवतीची अडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 06:00 AM2020-03-28T06:00:00+5:302020-03-28T06:00:40+5:30
मंडलापूर येथील स्वर्णरेखा या महिलेला प्रसुतीकळा सुरू झाल्यानंतर तिला सुरूवातीला सिरोंचा ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले. परंतु येथे शस्त्रक्रियेच्या अपुऱ्या सोयी व अहेरी तसेच गडचिरोली रूग्णालयापर्यंतचे लांब अंतर ही समस्या ओळखून कुटुंबीयांनी महिलेला तेलंगणा राज्यातील मंचेरियाल येथे भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रूग्णवाहिका रवाना झाली. परंतु सदर रूग्णवाहिका तेलंगणा सीमेवर पोलिसांनी अडविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्याच्या मंडलापूर येथील स्वर्णरेखा तुमनुरी या गर्भवती महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्याने तिला सिरोंचा ग्रामीण रूग्णालयातून बाहेर रेफर करण्यास अधिकाऱ्यांनी सांगितले. कुटुंबीयांनी महिलेला तेलंगणातील मंचेरियालच्या रूग्णालयात नेण्याचे ठरविले. परंतु तेलंगणा सीमेवर रूग्णवाहिका अडविण्यात आली. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर रूग्णवाहिका सोडण्यात आली.
मंडलापूर येथील स्वर्णरेखा या महिलेला प्रसुतीकळा सुरू झाल्यानंतर तिला सुरूवातीला सिरोंचा ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले. परंतु येथे शस्त्रक्रियेच्या अपुऱ्या सोयी व अहेरी तसेच गडचिरोली रूग्णालयापर्यंतचे लांब अंतर ही समस्या ओळखून कुटुंबीयांनी महिलेला तेलंगणा राज्यातील मंचेरियाल येथे भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रूग्णवाहिका रवाना झाली. परंतु सदर रूग्णवाहिका तेलंगणा सीमेवर पोलिसांनी अडविली. रूग्णवाहिकेला तेलंगणा राज्यात प्रवेश देण्यास मज्जाव केला. यावेळी महिलेला प्रसूतीकळा असह्य होण्यास सुरूवात झाली. जवळपास एक तास तेलंगणा सीमेवर रूग्णवाहिकेला पोलिसांनी अडवून ठेवले. याबाबत काही जागरूक नागरिकांनी याबाबतची माहिती जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांना दिली. त्यांनी मंचेरियालच्या जिल्हाधिकारी भारती होलिकेरी यांच्याशी संपर्क साधला. मात्र त्यानंतरही पोलिसांनी ऐकले नाही. त्यामुळे भोपालपल्लीचे पो.अधीक्षक संग्राम पाटील व रच्चाकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांच्याशी संपर्क करण्यात आला. त्यांनी सूचना दिल्यानंतर रूग्णवाहिकेला तेलंगणात प्रवेश देण्यात आला.
कुटुंबीयांनाही मनस्ताप
सोयीसुविधांअभावी महिलेला मंचेरियालच्या रूग्णालयात पोहोचविण्यासाठी संचारबंदीमुळे कुटुंबीयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. रूग्णवाहिका मंचेरियाल येथे पोहोचण्यासाठी रात्र झाली. तेथील खासगी रूग्णालयात महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली. यात महिलेने मुलीला जन्म दिला. मात्र यासाठी कुटुंबीयांनाही प्रचंड त्रास झाला. संचारबंदी किंवा प्रवेशबंदीच्या काळातही आकस्मिक सेवा असणाऱ्या रुग्णांना अडविता येत नाही. असे असताना तेलंगणा पोलिसांच्या असंवेदनशिलतेबद्दल सिरोंचावासियांमध्ये चिड व्यक्त होत आहे.