अवैध विकल्या जाणाऱ्या पेट्राेलचेही दर वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:38 AM2021-09-03T04:38:11+5:302021-09-03T04:38:11+5:30
गडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री अनेक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार ...
गडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री अनेक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार विक्रीसाठी पेट्राेल नेतात. पेट्राेलपंपांवर पेट्राेलचे दर वाढले असल्याने ग्रामीण भागातही अधिक दराने पेट्राेल विकले जात आहे.
अनेक पाणीपुरवठा याेजना बंद
आरमाेरी : जिल्ह्यातील अनेक गावात नळयोजनेंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या; परंतु या टाक्या शोभेच्या वास्तू ठरल्या आहेत. लहान ग्रामपंचायतीनाही पाणी पुरवठा याेजना मंजूर केल्या. निधी मिळाल्याने याेजना बांधल्या, मात्र वीज बिल भरणे शक्य नसल्याने अनेक याेजना बंद पडून आहेत.
साेनसरी परिसरातील मोबाईल सेवा कुचकामी
कुरखेडा : तालुक्यातील सोनसरी, उराडी परिसरात बीएसएनएलची भ्रमणध्वनी व दूरध्वनी सेवा पूर्णत: ठप्प झाली आहे. बीएसएनएलच्या भोंगळ कारभारामुळे ऑनलाईन कामे प्रभावित होत आहेत. विविध दाखले, तसेच प्रमाणपत्रे ऑनलाईन काढावी लागतात. काही ग्रामपंचायती ऑफटिकल फायबर केबलने जाेडण्यात आल्या आहेत. मात्र, त्याही ठिकाणी इंटरनेट व्यवस्थित काम करीत नसल्याचे दिसून येत आहे.
अरुंद रस्त्यामुळे अपघाताचा धोका
अहेरी : येथील मुख्य मार्ग अरुंद असल्याने, दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यानंतर इतर वाहने जाण्यासाठी मार्ग राहत नाही. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. उपविभागातील अहेरी हे महत्त्वाचे शहर आहे. अनेक कार्यालये या ठिकाणी असल्याने, ग्रामीण व दुर्गम भागातील जनता विविध कामांसाठी अहेरीत येथे राहते.
अभयारण्यातील गावांमध्ये जंगली श्वापदांची भीती
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान-मोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील पशूंमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्यपशूंनी अनेक हल्ले नागरिकांवर केले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत असतानाही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
केंद्रांअभावी नागरिकांची पायपीट
कोरची : तालुका भौगोलिक विस्ताराने लहान आहे; परंतु तालुक्यात अनेक गावे आहेत. लोकांसाठी निर्माण करण्यात आलेली महा-ई-सेवा केंद्रे अपुरी आहेत. नागरिकांना ६० ते ७० किमीचे अंतर कापावे लागते. त्यामुळे महा-ई-सेवा केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.
चामोर्शीत बांधकाम साहित्य रस्त्यावर
चामोर्शी : शहरातील विविध भागांत घराचे बांधकाम सुरू असून, बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. बांधकाम साहित्य हटविण्याची मागणी आहे.
तलाव सौंदर्यीकरणाचा प्रश्न थंडबस्त्यात
गडचिरोली : गोकुलनगरलगतच्या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आले होते. मात्र, सौंदर्यीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाले नाही. तलाव सौंदर्यीकरणाचा प्रश्न थंडबस्त्यात असल्याचे दिसून येत आहे.
औद्योगिक वसाहतीचे काम रखडले
धानोरा : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या धानोरा तालुका मुख्यालयात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे औद्योगिक वसाहतीचे काम थंडबस्त्यात पडले आहे.