सालगडी मजुरांचे भाव लाखाच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:34 AM2021-04-12T04:34:50+5:302021-04-12T04:34:50+5:30
भेंडाळा : तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतजमीन आहे. या शेतजमिनीची देखभाल करण्यासाठी सालगडी मजूर ठेवण्याची प्रथा गेल्या कित्येक दशकापासून ...
भेंडाळा : तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतजमीन आहे. या शेतजमिनीची देखभाल करण्यासाठी सालगडी मजूर ठेवण्याची प्रथा गेल्या कित्येक दशकापासून सुरू आहे. मात्र, दिवसेंदिवस सालगडी मजूर मिळणे कठीण झाले असून सध्या सालगडी मजुरांचे भाव लाखाच्या घरात पोहोचले आहेत.
शेतीसोबत जनावरे शेतकरी पाळत असतात. त्याची देखभाल करण्यासाठी शेतकरी दरवर्षी सालगडी मजूर वर्षभरासाठी ठेवत असतात. पूर्वी सालगडी मजूर सहज मिळत होते. मात्र, बदलत्या काळानुसार सालगडी मजूर म्हणून काम करण्यासाठी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशातच दरवर्षी सालगडी मजुरांच्या मजुरीचे दर वाढत चालले आहेत. त्यामुळे वर्षभर शेतीची देखभाल कशी करावी, हा प्रश्न सधन शेतकऱ्यांना पडला आहे. सालगडी मजुरांचे वर्षे गुढीपाडव्याला सुरू होत असते. गुढीपाडवा चार-पाच दिवसांवर येऊन ठेपला असतानासुद्धा सालगडी मजूर पक्के झाले नाहीत. त्यामुळे सधन शेतकरी जुन्या सालगडी मजुरांची मनधरणी करीत आहेत. विशेषतः सालगडी मजूर घराचे काम, मुला-मुलींचे लग्न व इतर कामासाठी किमान सहा महिन्यांची मजुरी एकत्र मागत असतात. कालानुरूप शेतातील कामे आता ठेका पद्धतीने मजुरांकडून केली जात आहेत तसेच जनावरे पाळणे मजुराअभावी कठीण होत चालले आहे. काही सालगडी मजूर परजिल्ह्यांत सालगडी म्हणून राहण्यासाठी जात आहेत. तसेच आता सालगडी मजूर म्हणून काम करण्यास कुणीही पुढे धजत नाही. त्याऐवजी आता सालगडी मजूर म्हणून काम करणारे हंगामी स्वरूपात काम करण्यासाठी परजिल्ह्यांत जात आहेत. त्यातून अधिक पैसे कमावित आहेत तसेच काही सालगडी मजूर घर बांधकाम करताना दिसून येत आहेत.
जनावरांची संख्या कमी होत चालली असून प्रत्येक गावात केवळ बोटावर मोजण्याइतपत गुराखी शिल्लक राहिले आहेत. गुराखी शेळ्या, मेंढ्या, गाय, म्हैस, आदी राखण करीत असतात. गुराख्याच्या जनावरांना चरावयाला मोकळी जागा उपलब्ध नसल्याने गुराखी नेहमीच शेतकऱ्यांशी शाब्दिक भांडण करीत असतात. त्यामुळे बऱ्याच गावातील गुराखी या कामापासून अलिप्त राहण्यास पसंत करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुधाळ जनावरे पाळणे कठीण होत चालले तसेच जनावरांची दरमहा राखण वाढत चालली असल्याने बरेच शेतकरी जनावरे विकून टाकत आहेत. केवळ चार महिन्यांचा अपवाद वगळता वर्षभर जनावरांना चराई करण्यासाठी कठीण होत आहे. तसेच सालगडी व गुराखी मजूर मिळणे आता कठीण झाले असून सालगडी मजुरांचे दर वाढले आहेत.
बाॅक्स
गुढीपाडव्यापासून हाेते खांदेपालट
सालगडी वर्षे गुढीपाडव्याला सुरू होते व काही सालगडी खांदेपालट करीत असतात. त्यामुळे गुढीपाडव्याला सालगडी मजुरांचे नवीन साल सुरू होत असते. याला मांडवस असेही ग्रामीण भागात म्हणतात. जनावरे राखण करण्यासाठी गुराखी ठेवण्याची परंपरा गुढीपाडव्यापासून होत असते.
बाॅक्स
जनावरांच्या देखभालीसाठी गुराखी मिळेना
जनावरांची संख्या कमी होत चालली असून प्रत्येक गावात केवळ बोटावर मोजण्याइतपत गुराखी शिल्लक राहिले आहेत. गुराखी शेळ्या, मेंढ्या, गाय, म्हैस, आदी राखण करीत असतात. गुराख्यांच्या जनावरांना चरावयाला मोकळी जागा उपलब्ध नसल्याने गुराखी नेहमीच शेतकऱ्यांशी शाब्दिक भांडण करीत असतात त्यामुळे बऱ्याच गावातील गुराखी या कामापासून अलिप्त राहण्यास पसंत करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुधाळ जनावरे पाळणे कठीण होत चालले तसेच जनावरांची दरमहा राखण वाढत चालली असल्याने बरेच शेतकरी जनावरे विकून टाकत आहेत. केवळ चार महिन्यांचा अपवाद वगळता वर्षभर जनावरांना चराई करण्यासाठी कठीण होत आहे.