खºर्यावर बंदी? शक्यच नाही भाऊ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 12:19 AM2017-08-13T00:19:55+5:302017-08-13T00:20:32+5:30
शासन आणि काही सामाजिक संस्था तंबाखूमुक्तीचा कितीही जागर करीत असले तरी तंबाखूजन्य सुपारी, अर्थात ‘खर्रा’ हा बहुतांश लोकांच्या सवयीचा भाग झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शासन आणि काही सामाजिक संस्था तंबाखूमुक्तीचा कितीही जागर करीत असले तरी तंबाखूजन्य सुपारी, अर्थात ‘खर्रा’ हा बहुतांश लोकांच्या सवयीचा भाग झाला आहे. वास्तविक कायद्याने खºर्यावर बंदी असली तरी ही बंदी आतापर्यंत तरी केवळ कागदावरच राहिली आहे. गडचिरोली शहरासह संपूर्ण जिल्हाभर खर्रा लपूनछपून नाही तर चक्क खुलेआमपणे बनवून त्याची विक्री होत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले.
लोकमत चमूने शहरातील इंदिरा गांधी चौक, विविध सरकारी कार्यालये असणारा कॅम्प परिसर, बस स्थानक चौक, चामोर्शी मार्ग, आरमोरी मार्ग आदी प्रमुख ठिकाणच्या पानठेल्यांवर खºर्याची मागणी केली. प्रत्येक ठिकाणी सहजपणे दोन मिनिटात खर्रा करून मिळाला. खºर्यावर बंदी आहे ना, तुम्ही खुलेआमपणे कसा विकता? असा प्रश्न एका पानठेलाचालकाला केला. त्यावर तो म्हणाला, ‘खºर्यावर बंदी? शक्य तरी आहे का भाऊ! जर तसे केले तर सर्व पानठेलेच बंद करावे लागतील...’ त्याचे हे उत्तर गडचिरोलीत खर्रा विक्री किती सहजपणे होते हे स्पष्ट करीत आहे.
पानठेल्यांवरून सुगंधित तंबाखू आाणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी आहे यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही अशी परिस्थिती गडचिरोली शहरात दिसून येते.
जिल्हाभरासाठी केवळ दोन अन्नसुरक्षा अधिकारी आहेत. तरीही पानठेल्यांची तपासणी अधूनमधून सुरू असते. गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू टाकून बनविलेला खर्रा यावर बंदी आहे. आम्ही अनेकांवर कारवाया केल्या असून खटलेही दाखल करणार आहोत.
- मिलींद देशपांडे, प्रभारी सहायक आयुक्त, एफडीए, गडचिरोेली
केवळ दीडशे पानठेल्यांची नोंदणी
एकट्या गडचिरोली शहरात शंभरावर पानठेले आहेत. जिल्हाभरात ही संख्या दीड हजारापेक्षा कमी नाही. मात्र अन्न व औषध प्रशासन विभागाकडे केवळ १०० ते १५० पानठेल्यांची नोंदणी असल्याचे तेथील अधिकाºयाने सांगितले. वास्तविक कोणतेही खाद्यपदार्थ विक्री करणाºया दुकानदारांना या विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. परंतू त्याची गरज कोणालाच वाटत नाही.
२०० रुपये दंड द्या अन् खुशाल विका खर्रा
बहुतांश पानठेल्यांमध्ये तंबाखूमुक्ती अभियानांतर्गत काही स्टिकर लावलेले दिसले. त्यावर ‘१८ वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे आणि खाणे कायद्याने गुन्हा आहे’ असा मजकूर लिहिला होता. हे स्टिकर कोणी लावले असे विचारले असता काहींनी आरोग्य विभागाच्या माणसांनी लावल्याचे तर काहींनी अन्न व औषध प्रशासन विभागाने लावल्याचे सांगितले. मग त्यांनी खर्रा विक्रीवर काही आक्षेप घेतला नाही का? असे विचारले असता ते म्हणाले, ‘नाही, फक्त २०० रुपये दंड केला आहे. त्याची पावतीही दिली. पण खर्रा विक्रीबद्दल ते काहीही बोलले नाही’ असे उत्तर अनेक पानठेलाचालकांनी दिले. त्यामुळे गडचिरोली शहरात खर्रा विक्री खुलेआम सुरू आहे.
जागोजागी लागल्या मशीन
सुपारी, सुगंधित तंबाखू आणि त्यावर चुन्याचे पाणी शिंपडून ते प्लॅस्टिकच्या पन्नीत बांधून एकत्र घोळले जाते. हे करण्यासाठी कमीत कमी वेळ आणि कमी श्रम लागावे म्हणून अनेक पानठेल्यांमध्ये चक्क वीजेवर चालणाºया खर्रा घोटण्याच्या मशिन लावण्यात आल्या आहेत. नागपूरमध्ये अशा मशिन बनवून मिळतात असे एका पानठेलेचालकाने सांगितले.
पानठेल्यांवर पानच गायब
कोणताही व्यवसाय मागणीच्या प्रमाणात पुरवठा या तत्वावर चालतो. पानठेलेसुद्धा त्याला अपवाद नाहीत. नागरिकांना खºर्याची इतकी सवय जडलेली आहे की, शरीरासाठी हाणीकारक नसणारे, पाचक तत्व असणारे पान खाण्यास कोणी तयार नाही. त्यामुळे गडचिरोलीत बहुतांश पानठेल्यांवरून पान गायब झाले आहे. केवळ खर्रा विक्री करणारे बहुतांश पानठेले असल्याचे लोकमतच्या पाहणीत दिसून आले.