जिल्हा परिषद शाळेत खासगी निवास; देलनवाडीत विद्यार्थ्यांनी केले आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 03:28 PM2024-09-24T15:28:55+5:302024-09-24T15:29:32+5:30
ग्रामपंचायतसमोर ठिय्या : अखेर कुटुंबाने सोडला ताबा; कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : देलनवाडी येथील एका कुटुंबाच्या राहत्या घरात पावसाच्या पाण्याने ओल आल्याने घर निवासासाठी योग्य नव्हते. यामुळे ग्रामपंचायतने त्या कुटुंबाला तात्पुरत्या स्वरूपात निवासासाठी येथील जि.प. शाळेच्या एका खोलीत आश्रय दिला. दोन महिन्यांनंतर स्वतःचे घर राहण्यायोग्य झाल्यानंतरही हे कुटुंबा शाळेची वर्गखोली सोडायला तयार नव्हते, अखेर शनिवारी येथील जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतसमोर आंदोलन केल्याने त्या कुटुंबाला खोलीचा ताबा सोडला.
देलनवाडी- मानापूर येथील वीज वितरण कार्यालयात सुरक्षा रक्षक पदावर कार्यरत संजना राजेंद्र मेश्राम यांचे राहते घर खोलगट भागात असल्याने पावसाळ्यात सुरुवातीला आलेल्या संततधार पावसाने घराला ओलावा आला. निवास करण्यासाठी हे घर योग्य नव्हते. तेव्हा तलाठी यांच्या विनंतीवरून संजना मेश्राम आणि त्यांच्या कुटुंबाला देलनवाडी येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळेने एका वर्गखोलीत तात्पुरत्या स्वरूपात निवासासाठी जागा दिली. आता पावसाळा अंतिम टप्प्यात आहेत. मेश्राम यांचे घर निवासासाठी योग्य झाले असतानाही त्यांनी शाळेची वर्गखोली खाली करून दिली नाही. शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मेश्राम यांना खोली सोडायला सांगितले; पण मेश्राम कुटुंबीयांनी शाळेची वर्ग खोली सोडली नाही. अखेर मुलांनी ग्रामपंचायतसमोर आंदोलन केल्याने त्यांनी वर्गखोली खाली केली.
वर्ग कोठे भरवावा, मुख्याध्यापकांसमोर प्रश्न
मेश्राम कुटुंबीय शाळेची वर्गखोली सोडायला तयार नव्हते. तेव्हा विद्यार्थ्यांचा वर्ग कोठे भरावावा, असा प्रश्न मुख्याध्यापक आणि शिक्षकांसमोर होता. ही तक्रार शाळा समितीपर्यंत गेली. शाळा समितीने सदर कुटुंबाला शाळेची खोली खाली करायला सांगावे, अशा आशयाचे अर्ज ग्रामपंचायतीला केले; ग्रामपंचायत प्रशासनदेखील दुर्लक्ष करीत होते.
ग्रामपंचायतने का केली दिरंगाई
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिव आणि ग्रामपंचायतला पत्र लिहून शाळेची खोली मेश्राम कुटुंबीयांनी खाली न केल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तरीसुद्धा मेश्राम कुटुंबाने शाळेची वर्गखोली सोडली नाही. ग्रामपंचायतीनेही कारवाई केली नाही. अखेर शनिवारी विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले, तेव्हा त्या कुटुंबाने वर्गखोलीवरून ताबा सोडला.