सरकारी सेवेकरांचा खासगी व्यवसाय बहरला
By admin | Published: September 29, 2016 01:31 AM2016-09-29T01:31:27+5:302016-09-29T01:31:27+5:30
जिल्हा परिषदेच्या सेवेतील व राज्य सरकारच्या सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना एनपीए (नॉन प्रॅक्टिसिंग अलॉऊंस) मिळत असल्याने
सोयीनुसार लावली जाते ड्यूटी : जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे दुर्लक्षच
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या सेवेतील व राज्य सरकारच्या सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना एनपीए (नॉन प्रॅक्टिसिंग अलॉऊंस) मिळत असल्याने त्यांना खासगी आरोग्य सेवा करण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असताना गडचिरोली शहरासह ग्रामीण भागातही शासकीय वैद्यकीय सेवेत राहून वैद्यकीय अधिकारी खासगी दवाखाने थाटून मनमानी पद्धतीने व्यवसाय करीत आहे. यांच्या वैद्यकीय दुकानदारीच्या पाट्या रस्त्यावर झळकत असतानाही जिल्हा आरोग्य अधिकारी तुम्ही मला नाव सांगा, असे विचारणा करतात, याचा अर्थ काय, हा प्रश्न जनतेच्या मनात अजुनही कायम आहे.
गडचिरोली शहरात बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, अस्थीरोगतज्ज्ञ यांच्यासह अनेक सरकारी डॉक्टरांचे खासगी दवाखाने जोरात सुरू आहे. या दवाखान्यांकडे आरोग्य यंत्रणेचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. शासकीय सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना खासगी दवाखाना टाकण्यास मनाई करण्यात आलेली असतानाही गडचिरोलीत हा धंदा मात्र तेजीत आहे. अशीच परिस्थिती आरमोरी शहरातही असल्याचे अनेक नागरिकांनी या वृत्तमालिकेनंतर लोकमतला फोन करून सांगितले.
जिल्ह्यात जि.प. सेवेतील अनेक वैद्यकीय अधिकारी खासगी व्यवसायाची दुकाने थाटून आहेत. हीच परिस्थिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची आहे. त्यांनी तर अनेक मेडिकल स्टोअरवाल्यांच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून घेतल्या आहे. या डॉक्टरांच्या सोयीसाठी मेडिकल स्टोअरवाल्यांनी खासगी दवाखान्यात एसी लावून देण्यापासून त्यांच्या दवाखान्याचे वीज बिल भरण्यापर्यंत साऱ्या जबाबदाऱ्या उचलल्या आहे. काही मेडिकल दुकानदारांनी तर डॉक्टरांचे कॉम्प्लेक्सच उघडले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात १२ तासापेक्षा अधिक काम असताना अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांशिवाय कोणताही वैद्यकीय अधिकारी सकाळी व रात्री दिसून येत नाही. सर्व वैद्यकीय अधिकारी आपल्या व्यवस्थित ड्यूट्या लावून घेत गडचिरोली शहरात व काही डॉक्टरांनी ब्रह्मपुरी येथे जाऊनही दवाखाना उघडला आहे. यांच्या खासगी व्यवसायामुळे गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात गरीब रुग्णांना सेवा मिळणे कठीण झाले आहे. मात्र जिल्हा शल्य चिकित्सकांचे या प्रकाराकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. आपल्या खासगी दवाखान्यात हे वैद्यकीय अधिकारी रुग्णांची तपासणी करतात. त्यांच्याकडून शस्त्रक्रियेच्या नावावर मनमाने पैसे वसूल करतात व त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्यास जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा धन्वंतरीसारख्या रुग्णालयात नेऊन शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळेच डॉ. शिवनाथ कुंभारे यांनी पत्रकार परिषदेत आपण रुग्णालयाची ओटी कुणालाही उपलब्ध करून देतो, अशी कबुली दिली. याचाच अर्थ गडचिरोली शहरात आता आरोग्य सेवा लूटमारीचा धंदा झाला, असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे.
गरीब रूग्णांना न्यायच नाही
गडचिरोली या मागास जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी येत नाही. आम्ही काम करतो, म्हणून या जिल्ह्यावर उपकार करतो, अशी भावना या डॉक्टरांची झाली आहे. त्यामुळे येथे सारे खपून जाते, असे दिसून येत आहे. वैद्यकीय अधिकारी गडचिरोलीत येत नाही म्हणून शासकीय सेवेत कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांना खासगी सेवा करण्याचा परवाना काही कुणी दिलेला नाही. गडचिरोलीत बट्टुवार कॉम्प्लेक्समध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सेवेत असलेले अनेक डॉक्टर रुग्णालय, दवाखाने थाटून आहे. साहित्याची विक्रीही रुग्णांच्या नातेवाईकांना येथून केली जाते. हा सारा प्रकार गरीब रुग्णांची फसवणूक करण्याचा प्रकार आहे. नागपुरात जाशील तर लाख रूपये लागेल, असे सांगून गरीब रुग्णांची पूर्ण पिळवणूक केली जात आहे. हे अलिकडच्या प्रकरणावरून दिसून आले आहे. एवढे मोठे प्रकरण घडल्यानंतरही या खासगी दवाखाने व मल्टीस्पेशालिटीच्या नावावर चालणाऱ्या व शासकीय नियमाची पायमल्ली करणाऱ्या एकाही रूग्णालयावर आरोग्य यंत्रणेने कारवाई केलेली नाही, याचे आश्चर्य जनतेलाही आहे.