३०-३५ प्रवाशांनी भरलेली खासगी ट्रॅव्हल्स उलटली; तीन गंभीर, १५ किरकोळ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2022 06:10 PM2022-11-25T18:10:29+5:302022-11-25T18:22:14+5:30
कोटगूल-वडसा मार्गावरील अपघात
कोरची (गडचिरोली) : कोटगुलवरून-वडसाला भरगच्च प्रवासी घेऊन जाणारी खासगी बस चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याकडेला बांधीत जाऊन उलटली. या अपघातात ३ प्रवासी गंभीर तर १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ दरम्यान बेडगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत घडली.
माहितीनुसार, कोटगूलवरून आकाश ट्रॅव्हल्स ३५ ते ४० प्रवासी घेऊन वडसाकडे जात होती. दरम्यान, कोरचीपासून ३ किमीवर असलेल्या बेडगाव वळणावर वाहनाचे एक्सेल तुटल्याने चालक धर्मेंद्र नारद फुलारी यांचे बसवरून नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स सरळ बांधीत जाऊन उलटली.
या घटनेत दीपिका सोनू शिकारी (२५) रा. देवरी, ता.रतनपूर, जि बिलासपूर (छत्तीसगड), आम्रपाली गोकुळ जांभुळकर (३६) रा.चपराड, ता. लाखांदूर, जि.भंडारा, कोरची आश्रम शाळेतील कामाठी आनंदराव नारायण मरापे (५८) हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
तर, १५ किरकोळ जखमींमध्ये बोरी येथील पोस्टमास्टर निकिता टेंभुर्णे (२१), श्यामलाल रामजी पुरामे (६५) रा.सोनपूर, शांताबाई ठाकुराम मडावी (३५) रा. कोरची, ललिता नारायण पडोटी (४०) सोनपूर, कुमारी अरविंद गावळे (३०) नांदनी, रामदास पांडुरंग जांभुळकर (७०) रा. चपराड, अरमान सोनू शिकारी (२) रा. शिराजपूर, जयाबाई गणेश धुर्वे (६८) रा. कुरखेडा, रसिका रामदास जांभुळकर (६७) रा. चपराड, रामचंद्र दुनियाजी तांडेकर (७५) रा. बेडगाव, निकिता विशाल टेंभुर्णे (२१) वर्षे रा. बोरी, नीलम मनोज मडावी (२१) वर्ष रा.मोहगाव, रचना सोनू शिकारी (०७) रा. शिराजपुर, मनोज सुधाराम मडवी (२५) वर्ष रा. मोहगाव, नंदिनी सोनू शिकारी (३४) वर्ष रा. शिराजपुर, रंन्तु शिवकुमारी शिकारी (४०) वर्ष रा. शिराजपुर यांना कोरची ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच बेळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. व जखमी प्रवाशांना ट्रॅव्हलमधून बाहेर काढून कोरची ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. या प्रकरणी कोरची पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
एसटी बंद विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचे हाल
शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी व मुलींसाठी मानव विकास योजनेअंतर्गत तालुक्याला जिल्हा अधिकारी यांनी ६ बसेसची सोय करून दिली आहे. पण गडचिरोली आगार व्यवस्थापकांनी शैक्षणिक सत्र अर्धे संपून गेले तरी एकही बस सुरू केली नाही. कोरची पंचायत समितीने यासाठी पुढाकार घेऊन बसेस सुरू करण्यासाठी ठराव पाठवले होते. परंतु, त्या ठरावाला आगार व्यवस्थापकांनी केराची टोपली दाखवली. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी ३-४ किमी अंतरावरून पायपीट करावी लागते.
एकेकाळी गडचिरोली व ब्रह्मपुरी आगाराला भरघोस उत्पन्न देणाऱ्या ब्रम्हपुरी आगारातील कोरची-नागपूर, ब्रम्हपुरी-कोरची-देवरी- गोंदिया तसेच गडचिरोली आगारच्या गडचिरोली-कोरची- बोरी, गडचिरोली-कोरची-कोडगुल या बसेस आगार व्यवस्थापकांनी बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मिळेल त्या वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे हे विशेष.