एसटीच्या थांब्यावरून खासगी वाहनांची प्रवाशी उचल
By admin | Published: February 12, 2016 01:48 AM2016-02-12T01:48:43+5:302016-02-12T01:48:43+5:30
गडचिरोली शहरात धानोरा मार्गावर राज्य परिवहन महामंडळाचे मुख्य बसस्थानक आहे. या बसस्थानक परिसरात धानोरा, पेंढरीकडे जाणाऱ्या अनेक काळी-पिवळी वाहने उभे राहतात.
गडचिरोली शहरात धानोरा मार्गावर राज्य परिवहन महामंडळाचे मुख्य बसस्थानक आहे. या बसस्थानक परिसरात धानोरा, पेंढरीकडे जाणाऱ्या अनेक काळी-पिवळी वाहने उभे राहतात. बसस्थानकावरून ते प्रवाशांना बोलावून आपल्या वाहनात बसवितात. गडचिरोली शहरात नव्याने बांधलेल्या महिला व बाल रूग्णालयासमोर इंदिरा गांधी चौकात एसटीचा अधिकृत थांबा आहे. येथे चंद्रपूरकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसेसही थांबतात व एसटीच्या आधी दिवसभर त्या रांगेत लागून राहतात. त्यामुळे एसटीचेच सर्व प्रवाशी दररोज मोठ्या प्रमाणावर वाहून नेतात. हा खासगी बसगाड्यांचा थांबा शहरातील वाहतुकीसाठीही अडचणीचा आहे. परंतु आरटीओ व पोलीस विभाग हा थांबा हटविण्यास आणाकानी करीत आहे.
चामोर्शी मार्गावर खासदार अशोक नेते यांच्या कार्यालयासमोर एसटीचा अधिकृत थांबा आहे. येथेही काळी-पिवळी वाहनचालक व काही खासगी बसगाड्या अनाधिकृतपणे थांबून एसटीच्या प्रवाशांची उचल करतात. त्यामुळे एसटीला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसत आहे.
आरमोरी मार्गावर श्री मंगल कार्यालयासमोर एसटीचा अधिकृत थांबा आहे. येथेही नागपूरकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसेसने आपली दुकानदारी उघडून आपल्या बसेस रस्त्यावर उभ्या ठेवून एसटीचे प्रवाशी उचलण्याचा गोरस धंदा गेल्या १०-१५ वर्षांपासून चालविला आहे.
एसटीच्या वेळापत्रकानुसार या सर्व मार्गावर खासगी बसेस आपलेही वाहने सोडतात. त्यामुळे एसटीला एकट्या गडचिरोली शहरात दररोज किमान ५० हजारावर अधिक रूपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागत आहे. खासगी वाहनांवर नियंत्रण आणण्याबाबत उच्च न्यायालयाने सक्त आदेश दिलेले असतानाही राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी विभागाला कुणीही सहकार्य करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एसटीला मोठ्या उत्पन्नाला मुकावे लागत आहे.