निकतवाडा परिसरात कव्हरेजची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:37 AM2021-04-27T04:37:00+5:302021-04-27T04:37:00+5:30

घोट : परिसरातील निकतवाडा परिसरात बीएसएनएल व अन्य खासगी कंपन्यांचे ग्राहक आहेत. या भागात कव्हरेजची समस्या वर्षभर कायम राहते. ...

Problem of coverage in Nikatwada area | निकतवाडा परिसरात कव्हरेजची समस्या

निकतवाडा परिसरात कव्हरेजची समस्या

googlenewsNext

घोट : परिसरातील निकतवाडा परिसरात बीएसएनएल व अन्य खासगी कंपन्यांचे ग्राहक आहेत. या भागात कव्हरेजची समस्या वर्षभर कायम राहते.

सुरक्षाकवच विना डीपी धोकादायक

देसाईगंज : तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. विद्युत प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपी मधून होत आहे.

चौकात अपघात वाढले

आलापल्ली : येथील सिरोंचा पुलाजवळ असलेल्या भंबारा चौकात भामरागड, चंद्रपूर, आलापल्ली व अहेरी हे चारही मुख्य मार्ग एकत्र येतात. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक उभारणे आवश्यक आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

वाहनांवर कारवाई करा

भामरागड : कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास वाव असतो. त्यामुळे विमा आवश्यक आहे. विमा नसलेल्या वाहनांवर कारवाईची गरज आहे.

जलद बसला थांबा द्या

गडचिरोली : येथून जवळच असलेल्या येवली येथे जलद बसला थांबा आहे. मात्र, गडचिरोली आगाराच्या बसगाड्या व्यतिरिक्त इतर आगारांच्या जलद बसगाड्या येथे थांबत नाहीत. त्यामुळे नागरिकांना गडचिरोली आगारात बसगाडी बदलावी लागत आहे.

वनविभागावर वाढला रिक्त पदांचा भार

गडचिराेली : जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ८० टक्के क्षेत्रफळ जंगलाने व्यापले आहे. यासाठी संपूर्ण जिल्हाभरात २ हजारपेक्षा अधिक वनकर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत चालला असून लाकूड तस्करी थांबविणे अशक्य झाले आहे.

डास व किटकांमुळे आरोग्य धोक्यात

एटापल्ली : शहरातील बहुतांश वाॅर्डातील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. ओपन स्पेस ही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी डास व किटकांची उत्पत्ती होत आहे. आरोग्य धोक्यात आले आहे. नगर परिषदेने फवारणी करून डास व किटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.

मोहझरीतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे

गडचिरोली : तालुक्यातील मोहझरी गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सदर रस्ते दुरूस्त करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. मोहझरी गावातील मुख्य मार्ग डांबरीकरणाने बनला आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

डुकरांच्या बंदोबस्ताकडे पालिकेचे दुर्लक्ष

गडचिरोली : गेल्या काही दिवसापासून गडचिरोली शहरातील सर्व २३ वॉर्डात डुकरांचा हैदोस प्रचंड वाढला आहे. मात्र, पालिकेच्या वतीने डुकरांच्या बंदोबस्ताकरिता काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम थंडबस्त्यात असल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाचे डुकराच्या हैदोसाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.

शाळा आवारात जनावरांचा वावर

आलापल्ली : अहेरी पंचायत समिती अंतर्गत दुर्गम गावातील जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना अद्यापही पक्क्या स्वरूपाची संरक्षक भिंत उभारण्यात आली नाही. तसेच अनेक शाळांना प्रवेशद्वार उभारले नाही. परिणामी, गावातील मोकाट जनावरे शाळा परिसरात जाऊन हैदोस घालीत आहेत.

कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करा

आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी हाेत आहे.

हेमाडपंती शिव मंदिर जीर्णावस्थेत

गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिवमंदिर आहे. सदर मंदिर हेमाडपंती आहे. या मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. सदर मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते, असे सांगितले जाते. या मंदिरातून भुयार जात असून ते भुयार वैरागड येथील किल्ल्यामध्ये निघते, अशी आख्यायिका आहे.

झुडुपी जंगल शेतीसाठी उपलब्ध करा

गडचिरोली : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये झुडुपी जंगल आहे. सदर जंगल शेतकऱ्यांना शेतजमिनीसाठी उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. वाढत्या लोकसंख्येबरोबरच जमिनीचे तुकडे ही वाढत चालले आहेत.

पोर्ला बसस्थानकावर गतिरोधकाची गरज

गडचिरोली : तालुक्यातील तसेच गडचिरोली-आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथील बसस्थानकात नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वेगात वाहने नेतात. त्यामुळे येथे गतिरोधक उभारावे, अशी मागणी होत आहे.

आवश्यकतेच्या ठिकाणी विद्युत खांब द्या

धानोरा : तालुक्यातील चव्हेला, मुंगनेर येथे वाढीव विद्युत खांब लावून वीजपुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसापासून मागणी केली जात आहे. परंतु, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले.

बसथांबा नजिक शौचालय बांधा

चामोर्शी : तालुक्यातील लखमापूर बोरी बसथांबा वरून भेंडाळा, मूल, चामोर्शी, आष्टी, गोंडपिंपरी व चपराळा आदी ठिकाणांसाठी दररोज बसेस जातात. या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे येथे शौचालय व मुत्रीघर उभारण्यात यावे, अशी मागणी लखमापूर बोरी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

पिशव्यांनी जनावरांचे आरोग्य धोक्यात

गडचिरोली : शहरात अनेक मोकाट जनावरे फिरत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी परिसरात फेकलेला केरकचरा, प्लास्टिक जनावरे खात असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

जीर्ण शाळा इमारती कायमच

चामोर्शी : तालुक्यासह जिल्हाभरात जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येणाऱ्या प्राथमिक शाळांच्या अनेक जुन्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. पावसामुळे जीर्ण इमारती कोसळण्याचा धोका नाकारता येत नाही. सतत मागणी करूनही जीर्ण इमारती निर्लेखित केल्या नाहीत.

चामोर्शीत बांधकाम साहित्य रस्त्यावर

चामाेर्शी : शहरातील विविध भागात घराचे बांधकाम सुरू असून बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवले आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून अपघाताची शक्यता वाढली आहे. बांधकाम साहित्य हटविण्याची मागणी आहे.

वैयक्तिक शौचालयांची गावांत कमतरता

गडचिराेली : अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली आदी दुर्गम तालुक्यातील अनेक गावांमध्ये वैयक्तिक शौचालये फारच कमी प्रमाणात आहेत. जिल्ह्यात १०० टक्के शौचालय असणारे एकही गाव नाही. यामुळे गोदरीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे आजारात वाढ होत आहे. ग्रामीण नागरिक मुख्य रस्त्यावरच शौचास बसतात.

खुल्या जागा ठरताहेत कुचकामी

देसाईगंज : नगर पालिका क्षेत्रात अनेक वार्डामध्ये ओपन स्पेस आहेत. मात्र काही मोजक्याच ओपन स्पेसला संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या ओपन स्पेसला संरक्षण भिंत नाही. तसेच या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. न.प. ने शहरातील सर्वच ओपन स्पेसचा विकास करण्याची मागणी आहे.

Web Title: Problem of coverage in Nikatwada area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.