मोबाईल कव्हरेजची समस्या सुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 05:00 AM2020-07-23T05:00:00+5:302020-07-23T05:00:02+5:30
सिरोंचा तालुक्यात बीएसएनएलचे जाळे ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे या कंपनीचे तालुक्यात सर्वाधिक ग्राहक आहेत. सिरोंचा, बामणी पोलीस स्टेशन, सिरोंचा बीएसएनएल कार्यालय, पेंटिपाका, आसरअल्ली येथे बीएसएनएलचे केबल टॉवर आहे. तर सिरोंचा जवळील अमरावती व वडदम येथे दोन वायरलेस टॉवर आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंकिसा : मोबाईलचा वापर दैनंदिन जीवनासाठी अतिमहत्त्वाचा भाग बनला आहे. यातच मोबाईल क्रांतीने इंटरनेटवर विविध कामे करणे सोयीचे झाल्याने इंटरनेसुद्धा अत्यावश्यक झाले आहे. मात्र सिरोंचा तालुक्यात भ्रमणध्वनी कव्हरेज व इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने ग्राहकांना मोबाईलवर संपर्क साधने व ऑनलाईन कामे करणे डोकेदुखी ठरत आहे. मात्र ही सेवा सुधारण्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांची दुर्लक्ष आहे.
सिरोंचा तालुक्यात बीएसएनएलचे जाळे ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे या कंपनीचे तालुक्यात सर्वाधिक ग्राहक आहेत. सिरोंचा, बामणी पोलीस स्टेशन, सिरोंचा बीएसएनएल कार्यालय, पेंटिपाका, आसरअल्ली येथे बीएसएनएलचे केबल टॉवर आहे. तर सिरोंचा जवळील अमरावती व वडदम येथे दोन वायरलेस टॉवर आहेत.
तालुक्यात एकूण सहा टॉवर आहेत. या माध्यमातून या माध्यमातून ग्राहकांना सशुल्क सेवा दिली जात आहे. शैक्षणिक तसेच शेतीविषयक बहुतांश कामे ऑनलाईन करावी लागतात. यासाठी इंटरनेटसेवा योग्य असणे तसेच वेगसुद्धा आवश्यक आहे. शेतकऱ्यांना तहसील कार्यालयातून विविध प्रकारची दाखले प्राप्त करण्याकरिता सेतू केंद्रातूनच ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. यासाठीसुद्धा इंटरनेटसेवा तीव्र वेगाची व सुरळीत असणे आवश्यक आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून येथील कव्हरेज व इंटरनेटचा बोजवारा उडाला आहे.
विद्यार्थी, शेतकरी व ग्राहकांना विविध कामे करण्यासाठी अडचणी येत आहेत. या संदर्भात अनेकदा बीएसएनएलच्या स्थानिक अधिकाऱ्यांना निवेदने देऊन कळविण्यात आले. मात्र त्यांच्यासह वरिष्ठ अधिकारी योग्य सेवा देण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी तालुक्यातील ग्राहक त्रस्त झाले आहेत.
खासगी कंपन्यांना परवानगी द्यावी
सिरोंचा तालुक्यात बीएसएनएलच्या नेटवर्कचे जाळे पसरले आहे. याचा वापर बहुतांश ग्राहक करीत आहेत. परंतु योग्य सेवा मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. वर्षभरापूर्वी तालुक्यात जिओ कंपनीच्या टॉवरची उभारणी करण्यात आली. परंतु वन विभाग व इतर शासकीय विभागाकडून परवानगी नाकारल्याने ऐनवेळी टॉवर सुरू झाले नाही. सध्या हे टॉवर शोभेची वस्तू ठरत आहे. तेलंगणा राज्याकडून कनेक्शन घेण्याचा प्रयत्नसुद्धा या कंपनीने केला होता. परंतु तेलंगणा सरकारनेसुद्धा याबाबतची परवानगी नाकारली. परिणामी ग्राहकांना खासगी कंपनीची सेवा मिळाली नाही. तालुक्यातील मोबाईल व इंटरनेट सेवेची झालेली दुरवस्था पाहता खासगी कंपन्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी राकाँचे तालुका सचिव रमेश चिंता यांनी केली आहे.