सिरोंचा तालुक्यात पक्के रस्ते व पुलांची समस्या कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:35 AM2021-02-13T04:35:29+5:302021-02-13T04:35:29+5:30
सिरोंचा : गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण टोकावर व प्राणहिता, गोदावरी या दोन मोठ्या नद्यांच्या किनाऱ्यांवर सिराेंचा शहर वसले आहे. तेलंगणा ...
सिरोंचा : गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण टोकावर व प्राणहिता, गोदावरी या दोन मोठ्या नद्यांच्या किनाऱ्यांवर सिराेंचा शहर वसले आहे. तेलंगणा व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या भाषेचा प्रभाव तालुक्यावर आहे. येथे स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही रेल्वेजाळे, कारखाने, लहानमोठा एकही उद्योगधंदा नाही. यामुळे तालुक्यातील अनेक मजूर परराज्यांत कामासाठी जातात. तालुक्यात पक्के रस्ते व पुलांची समस्या अद्यापही कायम आहे.
सिराेंचा तालुक्यात अनेक प्रकारची खनिजसंपत्ती विपुल प्रमाणात आहे. नंदीगाव परिसरात चुनखडकाचे साठे आहेत. तसेच गोदावरी व प्राणहिता या दोन नद्यांच्या खोऱ्यात दगडी कोळसा, जिप्समसारखे अनेक महत्त्वाचे खनिजसाठे आहेत. वनसंपत्तीमध्ये उतम दर्जाचे सागवान आहे. भामरागड व सिरोंचातील सागवानाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे. शेती क्षेत्रात शेतकरी कापूस व लाल मिरचीचे उत्पादन घेतात. मात्र, दळणवळणाची साधने व बाजारपेठ उपलब्ध नसल्याने नागपूर येथे मिरची व मध्य प्रदेशात कापूस विकावा लागताे. तालुक्यातील आसरअल्ली-अंकिसा व सिरोंचा परिसरात वर्जिनिया नावाचा उत्तम दर्जा व विदेशात मागणी असलेला तंबाखू पिकविला जाताे. हा तंबाखू आंध्र प्रदेश राज्यातील गुंटुर येथून कॅनडा देशात निर्यात होताे. शासनाने या तंबाखू उत्पादनावर बंदी आणली आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरसुद्धा तालुक्यात अनेक गावांमध्ये पक्के रस्ते व वीज पोहोचली नाही. रस्त्यांअभावी बससेवाही पोहोचली नाही.
गोदावरी नदीवरील पुलामुळे सिरोंचा तालुक्याला हैदराबाद व वरंगलसारख्या मोठ्या बाजारपेठा उपलब्ध झाल्या. खनिज व वनसंपत्तीच्या आधारावर लहानमोठे उद्योग उभारून येथे बनणारा कच्चा माल मोठ्या बाजारपेठेत नेण्यासाठी दळणवळणाची सोय करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने वरंगल ते सिरोंचा, ते जगदलपूर असे तीन राज्ये व सहा जिल्ह्यांना जोडणाऱ्या रेल्वेमार्गाला मंजुरी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
बाॅक्स ....
सिराेंचातील प्रभाग क्रमांक ५ मधील साफसफाई
स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गालगत झाडेझुडपे वाढली होती. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत हाेता. याबाबत मुख्याधिकारी विशाल पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी पुढाकार घेऊन मार्गातील झाडेझुडपे ताेडण्याचे काम मजुरांमार्फत सुरू केले. तसेच नालीतील गाळाची सफाई करण्यात आली. या कामाची पाहणी मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी केली. शहरात क्रीडासंकुलसमोरील नाली बांधकाम, विविध विकासकामे, रस्त्याची कामे सुरू आहेत, असेही मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले.