खरेदी केंद्राअभावी धान विक्रीची समस्या गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:01 AM2019-04-26T00:01:24+5:302019-04-26T00:03:11+5:30
उन्हाळी धान पिकाच्या कापणी व मळणीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र अजूनपर्यंत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे धानाच्या विक्रीची समस्या गंभीर झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : उन्हाळी धान पिकाच्या कापणी व मळणीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र अजूनपर्यंत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे धानाच्या विक्रीची समस्या गंभीर झाली आहे.
सिरोंचा तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, असे शेतकरी उन्हाळी धान पिकाची लागवड करतात. विहिरी व पाणीपंपाच्या माध्यमातून सिंचनाची साधने वाढल्याने दिवसेंदिवस उन्हाळी धानाचे क्षेत्र वाढत चालले आहे. जवळपास दोन हजार हेक्टरवर उन्हाळी धान पिकाची लागवड केली जाते. यावर्षी लवकरच उन्हाळी धान पिकाचे रोवणे आटोपले. त्यामुळे कापणी व मळणीही लवकरच झाली आहे. उन्हाळी धान विकून शेतकरी खरीपासाठी आवश्यक असलेले बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करतात.
सिरोंचा तालुक्यातील बहुतांश धान आदिवासी विकास महामंडळामार्फत धान्य खरेदी केंद्राच्या माध्यमातून खरेदी केले जातात.
दरवर्षी खरीप व उन्हाळी हंगामासाठी वर्षातून दोन वेळा धान खरेदी केली जाते. काही खरेदी केंद्रांवरील धानाची उचल अजूनपर्यंत आदिवासी विकास महामंडळाने केली नाही. त्यामुळे काही धान गोदामात तर काही उघड्यावर थप्पी लावून असल्याचे दिसून येते. उन्हाळी धानपीक निघाले असले तरी अजूनपर्यंत खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे विक्रीची समस्या गंभीर झाली आहे.
काही शेतकऱ्यांनी घरीच धान्य साठवून ठेवले आहेत. व्यापारी अत्यंत कमी किंमत देत असल्याने शेतकरी वर्ग धानाची विक्री खासगी व्यापाऱ्यांना करीत नाही. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळानेच या ठिकाणी धान खरेदी सुरू करावी, अशी मागणी आहे.
खासगी व्यापाऱ्यांकडून लूट
काही शेतकरी आपली अडचण लक्षात घेऊन खासगी व्यापाऱ्यांना धान विक्री करीत आहेत. मात्र त्यांना कमी किंमत मिळत आहे. तसेच बोनसपासून वंचित राहावे लागणार आहे. शासनाने मागील वर्षी प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस दिला होता. खासगी व्यापाºयांना धानाची विक्री झाल्यास बोनसच्या हक्कावर शेतकऱ्यांना पाणी फेरावे लागत आहे. शासन प्रती क्विंटल १ हजार ७५० रुपये भाव देत आहे. त्याचबरोबर प्रती क्विंटल ५०० बोनस असे एकूण धानाला प्रती क्विंटल २२५० रुपये भाव देत आहे. खासगी व्यापारी १ हजार ४०० रुपये प्रती क्विंटल दराने धान खरेदी करीत आहेत.
सिरोंचा तालुक्यासह आरमोरी, देसाईगंज तालुक्यांमध्ये उन्हाळी धान पिकाची लागवड केली जाते. याही परिसरात धानाचा एकमेव खरेदीदार आदिवासी विकास महामंडळ आहे. या परिसरातीलही धान लवकरच निघणार आहे. त्यामुळे धान खरेदी केंद्र सुरू करणे आवश्यक आहे.