रस्ते व नाल्यांची समस्या झाली बिकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 05:00 AM2020-06-25T05:00:00+5:302020-06-25T05:00:52+5:30
स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने सदर प्रभागातील विकास कामांचे योग्य नियोजन केले जात नसल्याने या प्रभागात सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याची अवस्था बिकट असून बऱ्याच ठिकाणी नाल्या फुटल्या आहेत. सदर प्रभागात दरवर्षी मोठमोठ्या घरांची बांधकामे होतात. नाहरकत प्रमाणपत्राच्या माध्यमातून पालिकेला या प्रभागातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक नगर पालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्र.६ मध्ये शिवाजी नगर वॉर्ड क्र.१८ व कॅम्प एरिया वॉर्ड क्र.७ चा समावेश आहे. विकसित प्रभाग अशी या प्रभागाची ओळख असली तरी या प्रभागात रस्ते, नाली, ओपन स्पेस व मोकळ्या भूखंडाची समस्या बिकट झाली आहे. अस्वच्छता व दुर्गंधीमुळे या प्रभागातील नागरिक हैराण झाले आहेत.
सुशिक्षित व सधन कुटुंब वास्तव्यास असलेल्या लोकांचा हा प्रभाग म्हणून ओळखल्या जातो. या प्रभागात बहुतांश प्लॉट अकृषक आहेत. तर काही प्लॉट अकृषक झाले नाही. शहरातील सर्वात विकसित व नागरीवस्तीचा अशी या प्रभाग क.६ ची ओळख आहे. मात्र सदर प्रभागाचा अद्यापही १०० टक्के विकास झाला नाही.
स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने सदर प्रभागातील विकास कामांचे योग्य नियोजन केले जात नसल्याने या प्रभागात सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याची अवस्था बिकट असून बऱ्याच ठिकाणी नाल्या फुटल्या आहेत. सदर प्रभागात दरवर्षी मोठमोठ्या घरांची बांधकामे होतात. नाहरकत प्रमाणपत्राच्या माध्यमातून पालिकेला या प्रभागातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. मात्र त्यामानाने मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात पालिका प्रशासन अपयशी झाल्याचे या प्रभागाच्या स्थितीवरून दिसून येते.
प्रस्तूत प्रतिनिधींनी सदर प्रभागात जाऊन मूलभूत सोयीसुविधांची पाहणी केली असता, अनेक ठिकाणी पक्के रस्ते, पक्क्या नाल्या व स्वच्छतेचा अभाव दिसून आला. सदर प्रभागातील नागरिक बºयाचदा नगर परिषद कार्यालयात जाऊन तक्रारवजा समस्या मांडतात. मात्र या समस्यांचे परिपूर्णरित्या निराकरण होत नसल्याचे या प्रभागातील काही नागरिकांनी लोकमतला सांगितले.
मोकळ्या भूखंडावर डुकरांचा हैदोस
पालिका प्रशासनाच्या वतीने काही महिन्यांपूर्वी मोकाट डुकर बंदोबस्त मोहीम राबविण्यात आली. मात्र त्यानंतर ही मोहीम पूर्णत: बंद पडली. गेल्या काही दिवसांपासून कॅम्प एरिया प्रभाग क्र.६ मध्ये डुकरांचा हैदोस वाढला आहे. या प्रभागात बरेच मोकळे भूखंड आहेत. या भूखंडावर काडीकचºयाचे साम्राज्य असून डुकरांचा हैदोस दिवसभर दिसून येतो. स्वच्छतेकडे कानाडोळा आहे.
कचऱ्याच्या दुर्गंधीने वॉर्डवासीय त्रस्त
इंदिरा गांधी चौकालगत शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला जिल्हा महिला व बाल रुग्णालय आहे. सदर रुग्णालयाचा वैद्यकीय कचरा निघतो. तसेच दैनंदिन कचराही निघतो. बायोवेस्ट कचऱ्याची विल्हेवाट रुग्णालय प्रशासनाच्या वतीने नियमित लावली जाते. मात्र प्लास्टिक इतर किरकोळ कचरा रुग्णालय परिसरात मागच्या बाजूकडील प्रवेशद्वाराजवळ कचराकुंडीत टाकला जातो. सदर कचराकुंडीतील कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्याचे काम नगर परिषद प्रशासनाकडे सोपविण्यात आले आहे. मात्र पालिकेच्या वतीने येथील कचऱ्याची नियमित विल्हेवाट लावली जात नसल्याचा आरोप रुग्णालय शेजारी असलेल्या शासकीय निवासस्थानातील कुटुंबधारकांनी केला आहे. सदर कचराकुंडीतील कचºयाने भरली असून उर्वरित कचरा अस्ताव्यस्त स्थितीत पडून आहे. यावर मोकाट डुकरे हैदोस घालत असल्याने येथे दुर्गंधी निर्माण झाली आहे. याचा त्रास लगतच्या नागरिकांना होत आहे. दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कॅम्प एरिया प्रभाग क्र.६ मध्ये ओपन स्पेसची पाच कामे साडेतीन वर्षाच्या कालावधीत झाली. शिवाजी नगरातील काही नाल्यांचे बांधकाम झाले. मंजूर कामांची संख्या मोठी आहे. मात्र निष्क्रीय प्रशासनामुळे या प्रभागातील अनेक कामे रखडली आहेत. सीसी रोड, डांबरीकरण व नालीची कामे प्रलंबित आहेत. भाजपच्या न.प.तील सत्तेच्या काळात एकही ठोस व मोठे काम झाले नाही.
- रमेश चौधरी, नगरसेवक, प्रभाग क्र.६
१ कोटी ३५ लाख रुपयातून चामोर्शी मार्गावरून हेडगेवार चौकाकडे जाणाºया सीसी रोडचे काम झाले. अडीच कोटी रुपयातून चामोर्शी मार्गावरून रेड्डी गोडाऊन-पोटेगावकडे जाणाºया रस्त्याचे काम सुरू झाले आहे. कंपनीकडून भूमिगतचे काम योग्य झाले. मात्र पेटी कंत्राटदाराच्या रस्ता दुरूस्तीच्या कामाचा दर्जा खालावला आहे.
- अल्का अनिल पोहणकर, नगरसेविका, प्रभाग क्र.६
कॅम्प एरियात रस्ते व नालीची कामे झाली. मात्र या कामाचा दर्जा पूर्णत: खालावला आहे. भूमिगत गटारलाईनसाठी खोदलेले रस्ते योग्यरित्या बुजविण्यात आले नाही. पावसाच्या पाण्यामुळे रस्ते चिखलमय होत आहेत. या रस्त्यावरून दुचाकी वाहने स्लिप होऊन वाहनधारकांना इजा होत आहे. मोकळ्या भूखंडात कचºयाचे साम्राज्य असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. पालिकेने याबाबत ठोस धोरण आखावे.
- समशेर खॉ पठाण, नागरिक प्रभाग क्र.६'
महिला रुग्णालयालगत शासकीय कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आहे. येथे जि.प. हायस्कूलमधील शिक्षक व कर्मचारी वास्तव्यास राहतात. रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळील कचराकुंडीजवळ कचरा साचून राहतो. डुकरांचा हैदोस व कुजलेल्या कचºयाने दुर्गंधीचा त्रास होतो.
- सचिन फुलझेले, नागरिक, प्रभाग क्र.६
ओपन स्पेसमुळे ज्येष्ठ व बालकांना दिलासा
नगर परिषदेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून प्रभाग क्र.६ कॅम्प एरियामध्ये प्राचार्य जयंत येलमुले यांच्या घरासमोरील ओपन स्पेस विकसित करून त्याचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. सायंकाळच्या सुमारास या परिसरातील ज्येष्ठ नागरिक व बालक तसेच मुलांना बसणे व खेळण्याची व्यवस्था झाली आहे. येथे खेळण्याचे साहित्य आहे.
कचराकुंड्यांना वादळाचा तडाखा
गडचिरोली नगर परिषद प्रशासनाच्या वतीने शहराच्या कॅम्प एरियासह अनेक ठिकाणी फायबरच्या कचराकुंड्या ठेवण्यात आल्या. विविध ठिकाणचे मंदिर, चौक व लोकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी हे फायबर कुंड्या लावण्यात आल्या. कॅम्प एरियातील दुर्गा माता मंदिरजवळ लावलेल्या फायरबर कुंड्याचे अँगल वादळाने वाकले.