वृक्षतोडीची चौकशी संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 10:45 PM2019-02-14T22:45:03+5:302019-02-14T22:45:33+5:30
आरमोरी-जोगीसाखरा रस्त्यालगत असलेल्या नहर व शेतातून अवैधपणे वृक्षांची तोड करण्यात आल्याचे प्रकरण नऊ दिवसांपूर्वी उघडकीस आले. मात्र या प्रकरणाची चौकशी अतिशय संथगतीने सुरू आहे. नऊ दिवसांचा कालावधी उलटूनही अजूनपर्यंत कुणावरही गुन्हा दाखल करण्यात वनविभागाला यश न आल्यामुळे या प्रकरणात नेमके काय शिजत आहे याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी-जोगीसाखरा रस्त्यालगत असलेल्या नहर व शेतातून अवैधपणे वृक्षांची तोड करण्यात आल्याचे प्रकरण नऊ दिवसांपूर्वी उघडकीस आले. मात्र या प्रकरणाची चौकशी अतिशय संथगतीने सुरू आहे. नऊ दिवसांचा कालावधी उलटूनही अजूनपर्यंत कुणावरही गुन्हा दाखल करण्यात वनविभागाला यश न आल्यामुळे या प्रकरणात नेमके काय शिजत आहे याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.
इटियाडोह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनीही नहरातील सागाची झाडे चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. एक झाड विनापरवानगीने तोडले म्हणून वनविभागाने ते झाड जप्त केले व पीआर फाडला. त्यानंतर संबंधित शेतकरी, ठेकेदार, दिवानजी यांचे बयान वनविभागाने नोंदविले. जी सागाची झाडे तोडली गेली, ती झाडे आपल्या मालकीची असल्याचे संबंधित शेतकºयाचे म्हणणे आहे तर दुसरीकडे इटियाडोह प्रकल्पाच्या अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार ती नहरातील झाडे आहेत. नेमकी ही झाडे कुणाच्या मालकीची आहेत, याचा तपास वनविभाग करीत आहे. याप्रकरणी वनविभाग व पोलीस संयुक्तरित्या चौकशी करणार असल्याची माहिती आहे.
नऊ दिवसांचा कालावधी उलटूनही चौकशी पूर्ण करून गुन्हा दाखल केला नसल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित केली जात आहे. वनविभागाचे अधिकारी संबंधितांना पाठीशी घालण्यासाठी चौकशीत विलंब करीत असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.
शिवसेनेचा इशारा धुडकावला
आरमोरी-जोगीसाखरा रस्त्यालगत असलेल्या नहरावरील व शेतातून आंबा, साग आदी झाडांची अवैधपणे तोड करण्यात आली. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हरीश मने यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी ११ फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण चौकशी करून कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, पण प्रत्यक्षात १४ फेब्रुवारी उलटली तरी ना गुन्हा दाखल झाला, ना कोणते आंदोलन झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला ऊत येत आहे.