सिरोंचा तालुक्यात बेरोजगारीची समस्या तीव्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:50 PM2018-09-17T22:50:23+5:302018-09-17T22:50:46+5:30
तालुक्यातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून उद्योगधंदे नसल्याने तालुक्यात बेरोजगारांची फौज निर्माण झाली आहे. एकेकाळी सुखसपन्न व श्रीमंत असलेल्या या तालुक्याची परिस्थिती आता अतिमागास तालुक्यासारखी झाली आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती तालुक्यात मोठ्या प्रमाणात असली तरी शासनाच्या वतीने येथे उद्योग निर्माण करण्यात न आल्याने बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढली आहे.
कौसर खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्यातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून उद्योगधंदे नसल्याने तालुक्यात बेरोजगारांची फौज निर्माण झाली आहे. एकेकाळी सुखसपन्न व श्रीमंत असलेल्या या तालुक्याची परिस्थिती आता अतिमागास तालुक्यासारखी झाली आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती तालुक्यात मोठ्या प्रमाणात असली तरी शासनाच्या वतीने येथे उद्योग निर्माण करण्यात न आल्याने बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढली आहे.
रोजगाराअभावी तालुक्यातील बेरोजगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. ‘इकडे आड व तिकडे विहीर’ अशी अवस्था बेरोजगारांची झाली आहे. हाताला जे काम मिळेल ते काम करण्यास येथील बेरोजगार इच्छुक आहे. मात्र येथे कोणतेही काम मिळत नसल्याने बेरोजगारांमध्ये नाराजी पसरली आहे. शासनाने नोकरभरती देखील पूर्णत: बंद केली आहे. सिरोंचा शहर व तालुक्यात सध्या शेत व इतर कामावरील मजुरीचे दर प्रतिदिवस २०० ते २५० रूपये आहे. मात्र एवढ्याशा मजुरीत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण होत आहे. उच्च शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमाचे प्रवेश, शिक्षण शुल्क भरमसाठ वाढविण्यात आल्याने अनेक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्य व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील एखादा मुलगा डॉक्टर अथवा अभियंता होणे हे दिव्य स्वप्न ठरले आहे. तालुक्याच्या कोपेला-अमडेली भागात काही वर्षांपूर्वी चुणखडीचे साठे आढळून आले होते. मात्र शासनाच्या वतीने उद्योग निर्मितीबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. शासनाच्या वतीने येथे नव्याने सर्वेक्षण केल्यास, एखादा नवीन उद्योग उभा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बेरोजगारीच्या या समस्येकडे विद्यमान केंद्र, राज्य सरकारसह जिल्हा व तालुक्यातील लोकप्रतिनिधी कानाडोळा करीत आहेत.