पोलीस अधीक्षकांवर नागरिकांकडून समस्यांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2016 01:22 AM2016-02-14T01:22:50+5:302016-02-14T01:22:50+5:30

तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या कोठी पोलीस मदत केंद्राला गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी नुकतीच ...

The problems of the citizens on the police superintendent rain | पोलीस अधीक्षकांवर नागरिकांकडून समस्यांचा पाऊस

पोलीस अधीक्षकांवर नागरिकांकडून समस्यांचा पाऊस

Next

कोठी पोलीस मदत केंद्राला भेट : दुर्गम भागातील नागरिकांनी विविध प्रश्न मांडले; पोलिसांशीही साधला संवाद
भामरागड : तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या कोठी पोलीस मदत केंद्राला गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी नुकतीच भेट देऊन येथील पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी परिसरातील नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना आपल्या भागातील विविध अडचणी सांगितल्या.
भामरागड तालुक्याचा दुर्गम भाग असलेल्या कोठी येथे जिल्हा पोलीस अधीक्षक पोहोचले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक जगन्नाथ नरोटी, राजेंद्र मडावी यांच्यासह विविध नागरिक उपस्थित होते. या भागात आरोग्याची समस्या गंभीर आहे. आरोग्य पथकात कोणीही कर्मचारी राहत नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिली. भामरागडला जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. भाडे देऊनसुध्दा वाहनचालक रस्त्याच्या वाईट स्थितीमुळे या भागात गाडी टाकण्यास तयार होत नाही. ग्रामसेवक मुख्यालयी राहत नाही. या परिसरातील अनेक गावांमध्ये वीज पुरवठा नाही.
आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी कुणीही अधिकारी आमच्यापर्यंत येत नाही. गावालाही कधी भेट देत नाही. भेट दिली तर ग्रामस्थांशी कोणी संवादही साधत नाही, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी पोलीस अधीक्षक पाटील यांच्याकडे केली. आपण आमच्या गावापर्यंत आलात, आम्हाला भेटला, याचा आम्हाला आनंद आहे, अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली. याप्रसंगी कोठी पोलीस मदत केंद्रात कार्यरत पोलीस जवानांशीही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. या भागात पोलीस विभागाच्या वतीने क्वॉरटर बांधकाम सुरू करण्यात आले आहे. त्याची पाहणीही पोलीस अधीक्षकांनी केली. बराच वेळ पोलीस अधीक्षक मदत केंद्रात होते. तेथे त्यांनी सर्व जवानांशी संवाद साधला.

Web Title: The problems of the citizens on the police superintendent rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.