आरमोरीत काँग्रेसच्या अडचणी वाढणार
By admin | Published: May 30, 2014 12:05 AM2014-05-30T00:05:01+5:302014-05-30T00:05:01+5:30
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आरमोरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस उमेदवाराला ४३ हजार मतांचा फटका बसला आहे. काँग्रेस आमदार असूनही उमेदवार माघारला. त्यामुळे आगामी विधानसभा
नाराजी वाढली : सातत्याने होत आहे मताधिक्य कमी
आरमोरी : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आरमोरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस उमेदवाराला ४३ हजार मतांचा फटका बसला आहे. काँग्रेस आमदार असूनही उमेदवार माघारला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेससाठी धोक्याची घंटा वाजायला सुरूवात झाली आहे.
आनंदराव गंगाराम गेडाम हे काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार आहेत. मागील १0 वर्षांपासून ते या भागाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. आनंदराव गेडाम यांनी १९९९ मध्ये काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना ३६ हजार ४ मते मिळाली होती. ते ४0६ मतांनी पराभूत झाले होते. त्यानंतर २00४ ते निवडणुकीसाठी पुन्हा काँग्रेस पक्षाकडून उभे राहिले. त्यावेळी त्यांना ५३ हजार ५६७ मते मिळाली होती व त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारावर १२ हजार ७२६ मतांनी विजय मिळविला होता. त्यानंतर पुन्हा २00९ च्या निवडणुकीत आनंदराव गेडाम आरमोरी क्षेत्रातून काँग्रेसच्या तिकीटावर उभे राहिलेत. या निवडणुकीत आनंदराव गेडाम यांना ४१ हजार १७६ मते मिळाली. या निवडणुकी त्यांनी ५ हजार ५८३ मतांनी विजय मिळविला. हा विजय केवळ आरमोरी तालुक्यातील मतदारांच्या भरवशावर मिळालेला होता. अलीकडेच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला आरमोरी विधानसभा क्षेत्रात ४८ हजार २0८ मते मिळाली आहे. म्हणजे प्रत्येक निवडणुकीत आरमोरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस उमेदवाराच्या विजयाचे मताधिक्य कमी-कमी होत आहे, असे दिसून येते. त्यामुळे २0१४ ची विधानसभा निवडणूक विद्यमान काँग्रेस आमदारांसाठी कसोटीची आहे. या भागात काँग्रेसच्या राजकारणावर सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांचे वर्चस्व आहे. ते व त्यांचे कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीत आमदार आनंदराव गेडाम यांच्यावर प्रचाराची धुरा सोपवून अलिप्त राहिलेत. राहुल गांधी यांच्या सभेला त्यांनी हजेरी लावली व मतदारांना पक्षाला मतदान करण्याचा आवाहन केले. मात्र आमदारांविषयी असलेली मागील १0 वर्षाची नाराजी प्रचंड प्रमाणात असल्याने या मतदार संघात काँग्रेसला ४३ हजाराचा फटका बसला आहे. गेल्यावेळी २00९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस केवळ १४ हजारांच्या मताधिक्याने माघारलेली होती. यंदा मात्र हे प्रमाण अडीच पटीने वाढले आहे. त्यामुळे काँग्रेस आमदारांसाठी धोक्याची घंटा वाजू लागली आहे. या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही अनेक कार्यकर्ते व नेते काँग्रेस पक्षाच्या आमदारावर नाराज आहेत. यापूर्वी अनेक कार्यकर्त्यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. सिंचनाचा प्रश्न सोडविण्यात आमदार १0 वर्षात अपयशी ठरले, असा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे विधानसभा निवडणूक अडचणीची आहे.