नक्षलग्रस्त भागातील वन कर्मचाऱ्यांच्या समस्या साेडविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:42 AM2021-09-12T04:42:24+5:302021-09-12T04:42:24+5:30
आलापल्ली, भामरागड व सिरोंचा वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने वनसंपदा इमारत आलापल्लीच्या पटांगणात वन हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. वन हुतात्मा ...
आलापल्ली, भामरागड व सिरोंचा वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने वनसंपदा इमारत आलापल्लीच्या पटांगणात वन हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. वन हुतात्मा स्मारकाचे उद्घाटन खा. अशोक नेते यांच्या हस्ते झाले. विशेष अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार, आ. धर्मरावबाबा आत्राम, गडचिराेलीचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, आलापल्लीचे उपवनसंरक्षक सी.आर. तांबे, सिराेंचाचे सुमित कुमार, भामरागडचे आशिष पांडे यांच्यासह आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, नागेपल्लीचे सरपंच लक्ष्मण कोडापे, भाजपचे पदाधिकारी बाबूराव कोहळे प्रामुख्याने उपस्थित होते.
आलापल्ली, भामरागड व सिरोंचा वन विभागातील अधिकारी व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी वर्गणी गाेळा करून वनसंपदा इमारतीच्या पटांगणात हुतात्मा स्मारकाची उभारणी केली. या स्मारकाचे खासदारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
जिल्ह्यातील बहुतांश भाग नक्षलग्रस्त असल्याने येथे समाजविघातक कारवायांमुळे वन कर्मचाऱ्यांना काम करणे अत्यंत जोखमीचे झाले आहे. अशाही परिस्थितीत वन कर्मचारी काम करीत आहेत. महाराष्ट्रातील सर्वांत मोठे जंगल गडचिरोली जिल्ह्यात राखून ठेवले आहे, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले.
शहिदांचे स्मारक हे आवश्यक असून, स्मारकामुळे हुतात्मे कायमस्वरूपी स्मरणात राहतात. आदिवासी व जंगलाचे अतूट संबंध राहिले आहेत. दिवसेंदिवस जंगलाचा ऱ्हास हाेत आहे. त्यामुळे जंगल वाचविणे काळाची गरज आहे. ऱ्हास वाढतच राहिल्यास वन्यप्राणी व मानव संघर्ष वाढण्याची शक्यता आहे, असे प्रतिपादन आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.
याप्रसंगी डाॅ. किशाेर मानकर, हरीश दहागावकर, संतोष पडालवार, वर्सल खान आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनहुतात्मा स्मारक समितीचे उपाध्यक्ष प्रभाकर आनकरी, संचालन पूर्वा दाेंतुलवार यांनी केले, तर आभार उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे यांनी मानले.
बाॅक्स
हे आहेत जिल्ह्यातील वनहुतात्मे
गडचिरोली वनवृत्तांतर्गत वनाचे रक्षण करताना वीरमरण प्राप्त झालेले वन शहीद बी.आर. पडाडे, जी.एन. पाटील, आर.एस. पेडीचर्ला, ए.आर. अर्का, एम.सी. मेकला, एस.पी. चिचघरे, जी.व्ही. दुर्गे, जे.आर. कुंजाम यांच्या प्रतिमेला कार्यक्रमादरम्यान पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली, तसेच वन हुतात्मांच्या परिवारातील सदस्यांचा शाल व साडी-चोळी देऊन सत्कार करण्यात आला.
बाॅक्स
पाेलीस विभागाच्या धर्तीवर लाभ
देण्यासाठी प्रयत्न करणार -खा. नेते
नक्षलग्रस्त भागात जीविताची पर्वा न करता वनसंरक्षणाचे कार्य करत असताना वेळप्रसंगी समाजविघातक कारवायांमध्ये वीरमरण पत्करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना पोलीस विभागाच्या धर्तीवर १५ लाख रुपये व अन्य साेयी लागू करण्याकरिता शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे खासदार अशाेक नेते याप्रसंगी म्हणाले.