गोकुलनगरात समस्यांचा अंबार

By Admin | Published: November 9, 2014 11:19 PM2014-11-09T23:19:25+5:302014-11-09T23:19:25+5:30

शहरातील गोकुलनगर प्रभाग क्रमांक ६ मध्ये १५, १६, २२, २३ क्रमांकाच्या चार वार्डाचा समावेश आहे. या प्रभागातील गोकुलनगर, चनकाईनगर, शिक्षक कॉलनी व अन्य भागात फुटलेल्या नाल्या,

Problems with Gokulnagar | गोकुलनगरात समस्यांचा अंबार

गोकुलनगरात समस्यांचा अंबार

googlenewsNext

पंचनामा प्रभाग क्र. ६ चा : फुटलेल्या नाल्या, डुकरांचा हैदोस, घाणीचे साम्राज्य आदी बाबींनी नागरिक हैराण
गडचिरोली : शहरातील गोकुलनगर प्रभाग क्रमांक ६ मध्ये १५, १६, २२, २३ क्रमांकाच्या चार वार्डाचा समावेश आहे. या प्रभागातील गोकुलनगर, चनकाईनगर, शिक्षक कॉलनी व अन्य भागात फुटलेल्या नाल्या, काही ठिकाणी रस्त्यांचा अभाव, घाणीचे साम्राज्य तसेच डुकरांचा हैदोस आदीसह अनेक समस्या निर्माण झाल्या असल्याचे आज ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.
गोकुलनगर प्रभाग क्रमांक ६ मध्ये चार वार्डांचा समावेश असून सदर प्रभागात मागास वस्ती व झोपडपट्टी वस्तीचा समावेश आहे. याशिवाय या भागात अनेक नव्या झोपडपट्टी वस्त्या निर्माण होत आहेत. मात्र या प्रभागात आवश्यक त्या पुरेशा सोयीसुविधा निर्माण करण्यात न आल्याने या प्रभागातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. गोकुलनगरातील गुरूद्वारासमोरील भागात नाल्या फुटलेल्या अवस्थेत आहे. तसेच कचरा अस्ताव्यस्त स्थितीत पडलेला आहे. चनकाईनगरातही नाल्या व रस्त्यांची समस्या कायम आहे. शिक्षक कॉलनी वॉर्ड क्र. १५ मध्ये अनेक मोकळ्या जागी घाण पाण्याचे डबके तयार झाले असून या ठिकाणी नाल्यांचा अभाव आहे. त्यामुळे सांडपाणी खुल्या जागेत पसरत आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
वॉर्ड क्र. १६ मधील मातंग मोहल्ल्यात नाल्यांचा नियमित उपसा होत नसल्यामुळे या ठिकाणच्या नाल्या सांडपाण्याने तुडूंब भरल्या आहे. घंटागाडीचे कित्येक दिवस दर्शन होत नसल्याचे या वॉर्डातील काही नागरिकांनी सांगितले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात वस्तीला लागून मोकळ्या जागेत कचऱ्यांचे ढीग निर्माण झाले असल्याने या ठिकाणी मोकाट डुकरांचा हैदोस नेहमी असतो. गोकुलनगर वॉर्ड क्र. २३ मध्ये पाण्याच्या टाकीच्या परिसरात कचरा अस्ताव्यस्त पडून असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी असलेली जुनी भूमीगत पाण्याच्या विहिरीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाणी आहे. या ठिकाणच्या विहिरीवर तात्पुरत्या झाकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीला संरक्षण भिंतीचा अभाव आहे. गोकुलनगर प्रभागात अनेक हातपंपांना प्लेट फार्म नाही. त्यामुळे हातपंपाच्या ठिकाणी अस्वच्छता दिसून आली. गोकुलनगर वॉर्ड क्र. २२ मध्ये शिवाजी हायस्कूलच्या मागील परिसरात अनेक ठिकाणच्या नाल्या सांडपाण्याने तुडूंब भरल्या आहेत. शिवाजी हायस्कूल बाजुकडील रस्त्याची नाली फुटली असून मोकळ्या जागेत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अशीच परिस्थिती गोकुलनगर प्रभाग क्र. ६ मध्ये सर्वच भागात पाहायला मिळाली. या प्रभागात काही ठिकाणी अपुरा नळ पाणीपुरवठा होत असल्याची बाबही नागरिकांच्या प्रतिक्रियेतून दिसून आली. (लोकमत चमू)

Web Title: Problems with Gokulnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.