भामरागडमधील पूरबाधित घरांच्या व व्यावसायिकांच्या पुनर्वसनासाठी प्रक्रिया राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 10:43 AM2020-09-02T10:43:54+5:302020-09-02T10:44:28+5:30
पालकमंत्री तथा मंत्री नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी भामरागड या ठिकाणी जाऊन त्याबाबत पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: जिल्ह्यातील दुर्गम अशा भामरागड तालुक्यांमध्ये गेल्या आठवड्यात पुरामुळे अनेक घरांचे, शेतीचे तसेच भामरागड शहरातील व्यावसायिकांचे नुकसान झाले होते. याबाबत पालकमंत्री तथा मंत्री नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी भामरागड या ठिकाणी जाऊन त्याबाबत पाहणी केली.
यावेळी त्यांनी संबंधित बाधितांना पुनर्वसनासाठी प्रशासनाकडून प्रक्रिया राबविण्यात येईल असे आवश्वासन दिले. भामरागड तहसील कार्यालयात पुरामुळे बाधित झालेल्या 120 गावांमधील 100 हून अधिक नागरिकांना ब्लँकेट व जीवनावश्यक साहित्याचे किट वाटप करण्यात आले. भामरागड तालुक्यातील सर्व गरजवंत कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य कीट व प्रत्येकाला एकेक ब्लँकेट मदत म्हणून दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्याधिकारी सुरज जाधव, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, सहाय्यक जिल्हाधिकारी मनोज जिंदल, तहसीलदार सत्यनारायण सिलमवार, अनमोल कांबळे उपस्थित होते.
यावेळी त्यांनी पूरस्थिती बाबत पूरग्रस्तांशी संवाद साधला व आवश्यक मदतीबाबत प्रशासनाला सूचना दिल्या.
वडसा व सावंगी येथील पूरस्थितीची केली पाहणी
यानंतर त्यांनी देसाईगंज वडसा येथील पूरग्रस्तांना व सावंगी येथील बाधितांना भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केली. सावंगी येथील तसेच देसाईगंज शहराजवळील पुरामुळे झालेल्या नुकसानाचेही पंचनामे तातडीने करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला सूचना दिल्या. सावंगी येथील भात आणि तूर शेतीचे झालेल्या नुकासानाची पाहणी केली. पालकमंत्र्यांनी यावेळी शेतकऱ्यांना प्रशासनाकडून आवश्यक भरपाई वेळेत मिळेल आम्ही तुमच्या पाठिशी आहे असा दिलासा दिला.