थकबाकीदारांविरोधात मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 01:19 AM2018-03-14T01:19:50+5:302018-03-14T01:19:50+5:30

चालू आर्थिक वर्ष संपण्याच्यापूर्वी मालमत्ता व पाणीपट्टी कराची १०० टक्के वसुली करून शासनाने दिलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी स्थानिक नगर पालिका प्रशासनाने कर वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे.

The process of seizing assets against the defaulters continues | थकबाकीदारांविरोधात मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू

थकबाकीदारांविरोधात मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू

Next
ठळक मुद्देनगरपालिका प्रशासन सरसावले : पहिल्या दिवशी एक चारचाकी व दुचाकी वाहन जप्त; सॉ मिल व घराला ठोकले कुलूप

ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : चालू आर्थिक वर्ष संपण्याच्यापूर्वी मालमत्ता व पाणीपट्टी कराची १०० टक्के वसुली करून शासनाने दिलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी स्थानिक नगर पालिका प्रशासनाने कर वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे. गेल्या पाच ते सहा वर्षापासून मालमत्ता कराचा भरणा न केलेल्या थकबाकीदारांच्या विरोधात पालिकेने मंगळवारपासून मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी प्रशासनाने एक चारचाकी व एक दुचाकी वाहन जप्त केले. तसेच एका सॉ मिलला व घराला कुलूप ठोकले.
गडचिरोली शहरातील अनेक कुटुंबधारकांवर चालू आर्थिक वर्ष व मागील थकबाकीपोटी लाखो रूपयांचे कर प्रलंबित आहे. पालिका प्रशासनाच्या वतीने दीड महिन्यापूर्वी ध्वनीक्षेपकाद्वारे जाहीर आवाहन करून कर भरण्याचे नागरिकांना सांगण्यात आले. या जाहीर आवाहनाला शहरातील काही कुटुंबधारकांनी प्रतिसाद देऊन पालिकेचे कार्यालय गाठून कराचा भरणा केला. मात्र बहुतांश थकबाकीदारांनी मालमत्ता कराचा भरणाच केला नाही. अशा थकबाकीदाराविरोधात पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी योग्य ते नियोजन करून मालमत्ता जप्तीची कारवाई हाती घेतली.
मुख्याधिकारी निपाने यांच्या आदेशानुसार पालिकेचे सहायक कर निरिक्षक चंद्रशेखर पुण्यपवार, कनिष्ठ लिपीक एस. पी. भरडकर, विनोद मेश्राम, नितेश सोनवाने यांच्यासह कर विभागाचे कर्मचारी व सफाई कामगार मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास शहराच्या वार्ड क्रमांक १८ मध्ये पोहोचले. पोलीस बंदोबस्तात थकबाकीदारांच्या घरी जाऊन जप्तीची कारवाई हाती घेतली. यावेळी कर्मचाºयांनी थकबाकीदारांची एक चारचाकी व एक दुचाकी वाहन जप्त केले. तसेच एका सॉ मिलला व घराला कुलूप ठोकले. विशेष म्हणजे, एका थकबाकीदाराची दुचाकी जप्त करीत असताना त्याने थकबाकीची रक्कम तत्काळ अदा केली. शिवाय एका शाळा प्रशासनानेही कुलूप ठोकण्याच्या भितीने थकबाकीची रक्कम तासाभरात अदा केली.
पालिकेच्या वतीने थकबाकीदारांना वारंवार तोंडी सूचना देण्यात आली होती. त्यानंतर जप्तीची कारवाई करण्यात येईल, अशी इशारावजा नोटीसही पाठविण्यात आली. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने अखेर पालिका प्रशासनाने मालमत्ता जप्तीची कारवाई हाती घेतली.
१५ वर्षात पहिल्यांदाच अशी कारवाई
थकीत व चालू वर्षाची मालमत्ता व पाणीपट्टी कर वसुलीसाठी पालिका प्रशासनातर्फे विविध अनेक शक्कल लढविल्या जातात. मात्र गेल्या १५ वर्षात थकबाकीदारांची मालमत्ता जप्त केल्याचे एकही उदाहरण नाही. गेल्या १५ वर्षात पालिकेकडून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीची केलेली ही पहिलीच कारवाई आहे, असे गेल्या २५ वर्षांपासून पालिकेत कार्यरत असलेल्या एका लिपीकाने लोकमतशी बोलताना सांगितले.

शहरातील कुटुंबधारकांनी चालू आर्थिक वर्षाच्या मालमत्ता व पाणीपट्टी कराचा भरणा ३१ मार्चपूर्वी करावा. तसेच थकबाकीदारांनी तत्काळ थकबाकीची रक्कम भरावी. पालिका प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली मालमत्ता जप्तीची कारवाई सुरूच राहिल.
- कृष्णा निपाने, मुख्याधिकारी, न.प. गडचिरोली

Web Title: The process of seizing assets against the defaulters continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.