हेक्टरी ३३ क्विंटल धानाचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 11:09 PM2018-12-20T23:09:48+5:302018-12-20T23:11:57+5:30
बागायत शेतीतील धानाची उत्पादकता हेक्टरी ३३.१२ क्विंटल तर जिरायती धानाची उत्पादकता हेक्टरी सरासरी २३.४९ किलो आढळून आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी धानाचे उत्पादन अधिक झाले असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बागायत शेतीतील धानाची उत्पादकता हेक्टरी ३३.१२ क्विंटल तर जिरायती धानाची उत्पादकता हेक्टरी सरासरी २३.४९ किलो आढळून आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी धानाचे उत्पादन अधिक झाले असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे सव्वा लाख हेक्टरवर धान पिकाची लागवड केली जाते. जिल्ह्यात कन्नमवार जलाशय वगळता मोठा सिंचन प्रकल्प नाही. मात्र धानपिकाला अगदी सुरुवातीपासून सिंचनाची गरज राहत असल्याने गावपातळीवर मामा तलाव व बोड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. तलाव व बोड्यांच्या माध्यमातून सिंचन उपलब्ध करून दिले जाते. ज्या धानाला सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा धानाला बागायत क्षेत्रातील धान समजले जाते. सुरुवातीपासून सिंचन सुविधा उपलब्ध होत असल्याने सादर धानाचे पीक चांगले येते. त्यामुळे दर हेक्टरी उत्पादनही अधिक होते.
बागायत क्षेत्रातील धानाच्या उत्पादनाची सरासरी काढण्यासाठी जिल्हाभरात १३० प्लॉट (१० मीटर चौरस धानाची जागा) टाकण्यात आले. या सर्व प्लॉटची सरासरी ३३.१२ क्विंटल येते.
ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा धानाला जिरायती धान समजले जाते. असे शेतकरी कमी कालावधीत परिपक्व होणारे धान टाकतात. या धानाची उत्पादकता निश्चितच कमी राहते. यावर्षी जिरायती क्षेत्रातील धानाची सरासरी २३.४९ क्विंटल उत्पादन झाले आहे.
मागील वर्षी जिल्हाभरात मावा व तुडतुडा रोगाने कहर केला होता. यावर्षी मात्र रोगाचे प्रमाण नगण्य होते. तसेच सुरुवातीपासून पाऊस झाला. त्यामुळे धानाच्या रोवणीची कामे वेळेत पार पडली. त्यामुळे धानाचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत अधिक झाले असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाºयांनी दिली आहे.
कापसाला फटका
जिरायती क्षेत्रात कापूस पिकाचे उत्पादन घेतले जाते. प्रामुख्याने चामोर्शी, मुलचेरा, सिरोंचा आदी तालुक्यांमध्ये कापसाचे उत्पादन होते. यावर्षी शेवटच्या टप्प्यात पाऊस झाला नाही. याचा फटका कापूस पिकाला बसला आहे. मागील वर्षी शेवटच्या टप्प्यात पाऊस झाला होता. त्यामुळे पिकाला अधिकची बोंडे येऊन कापूस पिकाचे उत्पादन वाढले होते. यावर्षी मात्र कापूस पिकाच्या उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता आहे. काही शेतकºयांचा तर खर्चही भरून निघणे अशक्य झाले आहे.
पावसाच्या उसंतीने पुन्हा धान मळणीला सुरूवात
रविवारी व सोमवारी झालेल्या पावसामुळे धानाची मळणी थांबली होती. अनेक शेतकºयांनी धानाच्या गंजीवर ताडपत्री झाकून धानाचे संरक्षण केले. पावसाने उसंत घेतल्यानंतरही दोन दिवस धानाची गंजी वाळण्यासाठी शेतकºयांनी वेळ दिला. त्यानंतर आता मात्र पुन्हा मळणीला सुरुवात झाली आहे. परंतु आठवडाभरापूर्वी जड धानाची बांधणी करून धानाची गंजी तयार करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे गंजीतील धान भिजले आहे. त्यामुळे या शेतकºयांच्या धानाला कमी दर मिळण्याची भीती अनेक शेतकरी व्यक्त करीत आहेत.