बसफेऱ्या वाढल्यास एसटीला नफा
By admin | Published: May 30, 2017 12:45 AM2017-05-30T00:45:17+5:302017-05-30T00:45:17+5:30
तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्यातील अंकिसा, आसरअल्लीपर्यंत दरदिवशी सुमारे २० बसफेऱ्या सुरू केल्या आहेत.
पुलानंतर दळणवळण वाढले : तेलंगणा राज्य परिवहन मंडळ उचलत आहे फायदा
प्रतीक मुधोळकर । लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्यातील अंकिसा, आसरअल्लीपर्यंत दरदिवशी सुमारे २० बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र महाराष्ट्र शासनाचा एसटी विभाग आवश्यकतेनुसार तेवढ्या बसफेऱ्या सोडण्यास उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवर पूल झाल्यापासून तेलंगणा व सिरोंचा तालुक्यातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सिरोंचालगत कालेश्वर देवस्थान आहे. या देवस्थानाला भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक भाविक जातात. त्यानुसार महाराष्ट्राच्या एसटी विभागाकडून कालेश्वरपर्यंत एक बस सोडण्यात येते. गडचिरोलीवरून सिरोंचा मार्गे एक बस तेलंगणा राज्यात जाते. तर अहेरी आगारातून बस चंद्रपूर मार्गे तेलंगणा राज्यात जाते. पूल झाल्याबरोबर दोन्ही राज्यांमध्ये नागरिकांचे आर्थिक व सामाजिक व्यवहार वाढले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिक तेलंगणा राज्यात व तेलंगणातील नागरिक महाराष्ट्रामध्ये ये-जा करतात. याचा पुरेपूर फायदा तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाने उचलण्यास सुरूवात केली आहे. तेलंगणा राज्यातील हैदराबाद, करीमनगर, मंचेरिअल, भूपालपल्ली, चेन्नूर, कालेश्वर, महादेवपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये अहेरी उपविभागातील नागरिक नेहमीच ये-जा करतात. या शहरांमध्ये मोठी बाजारपेठ आहे व आरोग्य सुविधाही उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांचा ओढा तेलंगणा राज्याकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे. याचा फायदा उचलत तेलंगणा सरकारने सिरोंचा, आसरअल्लीपर्यंत दिवसातून सुमारे २० बसफेऱ्या सोडण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही बसफेऱ्या वाढविण्याची आवश्यकता आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी सिरोंचा तालुक्यातील नागरिकांकडून आहे.
तेलंगणाच्या २० बसफेऱ्या
गोदावरी नदीवर पूल झाल्याबरोबर वाढलेल्या आर्थिक व सामाजिक संबंधांचा फायदा तेलंगणा राज्याने उचलण्यास सुरूवात केली आहे. पुलाचे उद्घाटन झाल्याच्या अगदी काही दिवसातच तेलंगणा राज्याने बसफेरी सुरू केली. सद्य:स्थितीत दिवसाच्या २० बसफेऱ्या सिरोंचा तालुक्यात ये-जा करीत आहेत. त्या मानाने एसटीने बसफेऱ्या सुरू करण्याची गरज आहे.े
दुसऱ्या राज्यात २० किमी पेक्षा जास्त अंतरावर बससेवा सुरू करण्यासाठी मंत्रालयस्तरावरून परवानगी घ्यावी लागते. दोन्ही राज्यात करार होणे गरजेचे आहे. राज्याचे उपवाहतूक व्यवस्थापक हैदराबाद येथे जाणार आहेत. जुलै महिन्यापासून नागपूर-कालेश्वर, गडचिरोली-कालेश्वर बसफेरी सुरू होणार आहे. अहेरी-वरंगल, चेन्नूर, हैदराबाद, करीमनगर शहरांपर्यंत बससेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. त्याला तांत्रिक परवानगी मिळायची आहे. सध्या रेगुंठा-कालेश्वर बसफेरी सुरू आहे.
- निलेश बेलसरे, विभागीय वाहतूक अधिकारी गडचिरोली