ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासनाकडून कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2022 10:42 PM2022-11-16T22:42:28+5:302022-11-16T22:42:58+5:30

अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली, वट्रा खुर्द आणि किष्टापूर दौड यांचा प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम तहसीलदारांनी बुधवारी जाहीर केला. नामनिर्देशनपत्र मागविण्याचा व सादर करण्याचा कालावधी २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर असा राहणार आहे. अहेरी तालुक्यासाठी तहसील कार्यालयाच्या इमारतीमधील मंडळ कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करता येतील. त्यांची छाननी ५ डिसेंबरला सकाळी ११ वाजता करण्यात येईल.

Program announced by the administration for Gram Panchayat Elections | ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासनाकडून कार्यक्रम जाहीर

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासनाकडून कार्यक्रम जाहीर

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली / अहेरी : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. येत्या १८ नोव्हेंबर रोजी त्यासंदर्भातील अधिसूचना जारी केली जाणार असून, सविस्तर कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला आहे. 
अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली, वट्रा खुर्द आणि किष्टापूर दौड यांचा प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम तहसीलदारांनी बुधवारी जाहीर केला. नामनिर्देशनपत्र मागविण्याचा व सादर करण्याचा कालावधी २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर असा राहणार आहे. अहेरी तालुक्यासाठी तहसील कार्यालयाच्या इमारतीमधील मंडळ कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करता येतील. त्यांची छाननी ५ डिसेंबरला सकाळी ११ वाजता करण्यात येईल. वैध ठरलेले नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी ७ डिसेंबरला दुपारी ३ पर्यंत वेळ देण्यात आली आहे. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होऊन निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
प्रत्यक्ष मतदान १८ डिसेंबरला सकाळी ७:३० वाजतापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत, तर मतमोजणी मंगळवार, दि. २० डिसेंबर रोजी होणार आहे. अहेरी तालुक्यात सार्वत्रिक निवडणूक होणार असलेल्या ३ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू झाली असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले. 

सुविधा केंद्रात ऑनलाइन नामनिर्देशनपत्र भरण्याची सुविधा

-    संभाव्य उमेदवारांना नामनिर्देशनपत्र आणि घोषणापत्र निवडणूक विभागाच्या वेबसाईटवरच भरणे अनिवार्य केले आहे. त्यासाठी महाऑनलाइन सुविधा केंद्रात नामनिर्देशपत्र ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यात उमेदवारांनी स्वत:ची नोंदणी करून घ्यावी व नामनिर्देशनपत्र, घोषणापत्राची माहिती भरून त्याचे प्रिंट आऊट काढावे. त्यावर स्वाक्षरी/अंगठा करून निवडणूक निर्णय अधिकारी  यांच्याकडे दाखल करावे, अशी सूचना प्रशासनाने केली आहे.

घोषणापत्रात सांगावी लागणार पार्श्वभूमी
-    उमेदवारांना त्यांचे नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी मालमत्ता व दायित्व तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतचे घोषणापत्र भरून द्यावे लागणार आहे. तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती, राखीव जागेसाठी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र (किंवा जात पडताळणी समितीकडे अर्ज सादर केल्याची पावती) आदी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

सदस्यांसाठी ५० हजार, तर सरपंचासाठी १.७५ लाखाची कमाल मर्यादा

ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या उमेदवारांनी करावयाच्या खर्चाच्या मर्यादेत सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार ७ ते ९ सदस्य संख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये २५ हजार रुपये, ११ ते १३  सदस्यसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये ३५ हजार रुपये, तर १५ ते १७ सदस्यसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींत ५० हजार रुपये एवढी खर्चाची मर्यादा राहणार आहे. 

सरपंचपदाच्या उमेदवाराला करावयाच्या खर्चाच्या मर्यादेतही सुधारणा करण्यात आली. त्यानुसार ७ ते ९ सदस्य संख्येच्या गावात ५० हजार रुपये, ११ ते १३  सदस्य संख्या असल्यास  १ लाख रुपये आणि १५ ते १७ सदस्य संख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी १ लाख ७५ हजार रुपये एवढी खर्चाची मर्यादा राहणार आहे. 

नामनिर्देशनपत्रासोबत अनुसूचित जाती किंवा अनु. जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव जागेसाठी १०० रुपये, तर सर्वसाधारण जागेसाठी ५०० रुपये एवढी अनामत रक्कम रोखीने भरावी लागणार आहे. विशेष म्हणजे उमेदवाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट  असणे अनिवार्य आहे.

 

Web Title: Program announced by the administration for Gram Panchayat Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.