सेवेमुळे जिल्हा बँकेची प्रगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 01:10 AM2018-03-14T01:10:55+5:302018-03-14T01:10:55+5:30
जिल्हा बँकेच्या दुर्गम भागात शाखा सुरू करण्यात आल्याने तेथील नागरिकांना बँकिंग सेवेचा लाभ मिळत आहे. बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे कर्तव्य व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे लोकांना बँकींग सेवा मिळत आहे.
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : जिल्हा बँकेच्या दुर्गम भागात शाखा सुरू करण्यात आल्याने तेथील नागरिकांना बँकिंग सेवेचा लाभ मिळत आहे. बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे कर्तव्य व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे लोकांना बँकींग सेवा मिळत आहे. त्यामुळेच जिल्हा बँकेची प्रगती सुरू आहे, असे गौरवोद्गार सहायक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी काढले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात बँकांच्या शाखांना उत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. तसेच यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कारही घेण्यात आला. या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, संचालक प्राचार्य खुशाल वाघरे, डॉ. बळवंत लाकडे, संचालिका शशिकला देशमुख आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गडचिरोली, आरमोरी येथील शाखांना उत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दुर्गम भागातून तळोधी शाखा प्रथम, कुनघाडा द्वितीय व मुलचेरा येथील शाखेला तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले. रंगय्यापल्ली, पोटेगाव व कोटगूल येथील बँक शाखांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार तर आभार मुख्य व्यवस्थापक अरूण निंबेकर यांनी मानले.