दुर्गापूरमधून जप्त केले कापसाचे प्रतिबंधित बीटी बियाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:39 AM2021-05-21T04:39:11+5:302021-05-21T04:39:11+5:30
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील दुर्गापूर येथे शासन प्रतिबंधित एचटीबीटी या वाणाचे कापूस बियाणे विक्री करण्याचा प्रयत्न कृषी विभागाच्या सतर्कतेने ...
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील दुर्गापूर येथे शासन प्रतिबंधित एचटीबीटी या वाणाचे कापूस बियाणे विक्री करण्याचा प्रयत्न कृषी विभागाच्या सतर्कतेने हाणून पाडण्यात आला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईनंतर दोघेही फरार झाले आहेत.
दुर्गापूर येथील एका विक्रेत्यामार्फत सदर बियाणे विकले जात असल्याची माहिती गुण नियंत्रण विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस स्टेशन, आष्टीचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले यांच्या मदतीने जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम, मोहीम अधिकारी के. जी. दोनाडकर, कृषी अधिकारी चामोर्शी वसंत वळवी यांनी छापा टाकला. बोगस बियाणे विक्री करत असलेल्या दुर्गापूर येथील अशित तुषार मिस्त्री आणि पागल तारापद मंडल या दोन व्यक्तींच्या घरातून कापूस बियाण्यांची एकूण १०४ पॅकेट जप्त केली. त्यांची किंमत ७८ हजार रुपये आहे. संबंधित विक्रेत्यावर जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन, आष्टी येथे बुधवारच्या रात्री १० वाजता गुन्हा नोंदविण्यात आला.
(बॉक्स)
कृषी केंद्र व गोदामांची तपासणी सुरू
जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाद्वारे जिल्ह्यात कापूस लागवडीच्या पट्टयात कृषी केंद्राच्या तसेच संशयित गोदामांच्या ठिकाणी तपासण्या सुरू आहेत. शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारे एचटीबीटी बियाणे लागवड करू नये, शासन मान्यताप्राप्त वाणांचीच लागवड करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.