प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 06:00 AM2020-02-26T06:00:00+5:302020-02-26T06:00:27+5:30
मेडीगड्डा सिंचन प्रकल्पाचे दरवाजे बंद केल्यामुळे गोदावरील नदीचे पाणी (बॅक वॉटर) सिरोंचा तालुक्याच्या १० गावातील एक हजार एकरपेक्षा अधिक शेतजमिनीत गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सदर प्रकल्पामुळे नदीपात्रात २२ किमीपर्यंत पाणी मागच्या बाजुने जाऊन हे पाणी शेतात पूर्णपणे पसरले आहे. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तेलंगणा सरकारच्या वतीने महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवर उभारलेल्या मेडीगट्टा प्रकल्पाच्या पाण्यामुळे सिरोंचा तालुक्याच्या एक हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. केंद्र सरकारकडे आपण ही सर्व वस्तूस्थिती मांडून प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार, अशी ग्वाही खासदार अशोक नेते यांनी दिली.
खासदार नेते यांनी मंगळवारी (दि.२५) मेडीगड्डा सिंचन प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. दरम्यान त्यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी दामोधर अरगेला, जिल्हा सचिव विनोद आकनपल्लीवार, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, मधुसुदन अरवेली आदी उपस्थित होते.
मेडीगड्डा सिंचन प्रकल्पाचे दरवाजे बंद केल्यामुळे गोदावरील नदीचे पाणी (बॅक वॉटर) सिरोंचा तालुक्याच्या १० गावातील एक हजार एकरपेक्षा अधिक शेतजमिनीत गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सदर प्रकल्पामुळे नदीपात्रात २२ किमीपर्यंत पाणी मागच्या बाजुने जाऊन हे पाणी शेतात पूर्णपणे पसरले आहे. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. शेतकऱ्यांचा हा गंभीर प्रश्न जिल्हाधिकारी व सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात मांडणार आहे. तसेच बाधीत शेतकºयांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करणार, अशी ग्वाही खासदार नेते यांनी दिली.
पंतप्रधानांकडे तक्रार करणार
मेडीगड्डा सिंचन प्रकल्पाबाबत तेलंगणा सरकारने तत्कालीन महाराष्ट्र सरकारसोबत करार केला. मात्र करारानुसार तेलंगणा सरकारने प्रकल्पाचे काम केले नाही. करारादरम्यान ठरविण्यात आलेल्या बाबींची पूर्तता तेलंगणा सरकारने केली नाही. त्यामुळे तेलंगणा सरकारकडून सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रचंड फसवणूक झाली आहे, असा आरोप खा. नेते यांनी केला. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार, असेही त्यांनी बाधीत शेतकऱ्यांना आश्वस्त केले.