लाखो रूपयांचे प्रोजेक्टर काही दिवसांतच पडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2017 01:16 AM2017-04-28T01:16:47+5:302017-04-28T01:16:47+5:30
तालुक्यातील काही शाळांना चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींनी प्रोजेक्टर खरेदी करून दिले आहेत.
खरेदीत गैरव्यवहार : ९९ हजार ५०० रूपयांचे बिल सादर
चामोर्शी : तालुक्यातील काही शाळांना चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींनी प्रोजेक्टर खरेदी करून दिले आहेत. या प्रोजेक्टरची किमत सुमारे ९९ हजार ५०० रूपये दाखविण्यात आली आहे. सदर प्रोजेक्टर अगदी काही दिवसांतच बंद पडले आहेत. त्यामुळे प्रोजेक्टर खरेदीमध्ये मोठा गैरव्यवहार झाला आहे. सदर प्रोजेक्टर बंद पडले असल्याची कबुली मुख्याध्यापकांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार चामोर्शी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी शाळा डिजिटल करण्यासाठी चौदाव्या वित्त आयोगातून डिजिटल साधने खरेदी करून दिली. त्यापैकी बहुतांश शाळांमधील प्रोजेक्टर काही दिवसातच अचानक बंद पडले. याबाबतची तक्रार कळमगाव, एकोडी, रामाळा, नवेगाव माल, दोटकुली, वाघोली येथील जागरूक लोकप्रतिनिधींनी नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समितीच्या आढावा बैठकीत केली होती. या प्रोजेक्टरची किमत ग्रामसेवकांनी ९९ हजार ५०० रूपये दाखविले आहे. शाळांमध्ये येराशाला येजू प्रोजेक्टर मॉडेल क्रमांक ईपी ६.० या कंपनीचे प्रोजेक्टर उपलब्ध करून दिली आहे. या प्रोजेक्टरची इंटरनेटवर किंमत शोधली असता, इंटरनेटवर किंमत आढळून आली नाही. त्याचबरोबर सदर प्रोजेक्टर काही दिवसातच बंद पडल्याने प्रोजेक्टर खरेदीत मोठा गैरव्यवहार झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
तालुक्यातील जवळपास सर्वच शाळांमध्ये एराशाला एज्यु प्रोजेक्टर ईपी ०.६ हाच मॉडेल उपलब्ध करून दिला आहे. मात्र याचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रोजेक्टरच्या बिलावर दर्शविलेली ९९ हजार ५०० रूपयांची किमत खोटी असून ग्रामसेवक व सरपंचांनी मिळून गैरव्यवहार केला असल्याचे स्पष्ट होत आहे. काही मुख्याध्यापक व सरपंचांनी शाळेतील प्रोजेक्टर बंद पडला असल्याचे लिहून दिले आहेत. प्रोजेक्टरबाबतच्या तक्रारी पंचायत समितीच्या आढावा बैठकीत झाल्यानंतर याबाबतची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. परंतु अजूनपर्यंत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली नाही. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी या घोटाळ्याकडे लक्ष घालावे, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
चौकशीचे आश्वासन हवेतच विरले
प्रोजेक्टर खरेदीतील गैरव्यवहार पंचायत समितीच्या आढावा बैठकीदरम्यान लोकप्रतिनिधींनी लक्षात आणून दिला होता. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश सभेचे अध्यक्ष आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिले होते. मात्र आता १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही या प्रकरणाची चौकशी झालेली नाही.