जिल्ह्यात गटशेतीला चालना द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:34 AM2021-05-17T04:34:51+5:302021-05-17T04:34:51+5:30
गडचिरोली जिल्ह्यात अत्यल्प शेतजमीन धारक शेतकरी ४५ टक्के आहेत. तसेच अल्पभूधारक ३० टक्के व मोठे शेतकरी २५ टक्के आहेत. ...
गडचिरोली जिल्ह्यात अत्यल्प शेतजमीन धारक शेतकरी ४५ टक्के आहेत. तसेच अल्पभूधारक ३० टक्के व मोठे शेतकरी २५ टक्के आहेत. गट शेतीमधून पीक पद्धती निवडणे, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे व शेतमाल विक्री यासाठी फायदे आहेत. जिल्ह्यात १ लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप, ६७ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी होते. पारंपरिक शेतीमध्ये आजच्या विकेल ते पिकेल या योजनेनुसार आधुनिकतेची जोड देऊन नवनवे प्रयोग सुरू करावेत. नावीन्यपूर्ण पीक पद्धती निवडून शेती व्यवसायाला चालना देता येईल यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
खरीप बैठकीला जिल्हाधिकारी दीपक सिंगला, खासदार अशोक नेते, आमदार अभिजीत वंजारी, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्यासह कृषी अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत खासदार अशोक नेते व आमदारांनी आपापले विषय व समस्या मांडल्या. जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी खरीप हंगामाबाबत माहिती दिली. कृषी अधीक्षक गडचिरोली भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी नियोजनाबाबत व जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण उपक्रमांबाबत सादरीकरण केले.
शेतीमध्ये प्रयाेग करा
जिल्ह्यात सध्या भात, कापूस, तूर, हरभरा, जवस व मका या पिकांना प्राधान्य आहे. यामध्ये काही ठिकाणी स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रूट, नागली, तेलबिया पीक असे नवनवे प्रयोग सुरू केले आहेत. त्यामध्ये वाढ करावी. औषधी वनस्पतीची लागवड वाढवावी. चांगल्या दर्जाची बियाणे वापरून व रासायनिक खतांचा कमी वापर करून शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेता येते, यासाठी नियोजन करावे असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी कृषी विभागाने सुचविल्याप्रमाणे नदीकाठच्या शेतकऱ्यांना इंजिन, मोटर तसेच तुषार सिंचन यासाठी योजना आखावी असे निर्देश दिले.