दुर्गम भागासाठी बाईक अॅम्ब्युलन्सचा प्रस्ताव बारगळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 08:51 PM2020-07-11T20:51:08+5:302020-07-11T20:52:13+5:30
विपरित भौगोलिक परिस्थितीमुळे रुग्णांसाठी बाईक अॅम्ब्युलन्स देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने आरोग्य संचालकांकडे पाठविला होता, मात्र परिवहन विभागाने त्या पद्धतीची अॅम्ब्युलन्स नियमात बसत नसल्याचे सांगितल्यामुळे आरोग्य संचालकांनी तो प्रस्ताव नामंजूर केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील दुर्गम भागात रस्ते आणि पुलांअभावी रुग्णांचे होत असलेले हाल आणि त्यामुळे अनेकांवर जीव गमवावा लागण्याची वेळ येण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विपरित भौगोलिक परिस्थितीमुळे रुग्णांसाठी बाईक अॅम्ब्युलन्स देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने आरोग्य संचालकांकडे पाठविला होता, मात्र परिवहन विभागाने त्या पद्धतीची अॅम्ब्युलन्स नियमात बसत नसल्याचे सांगितल्यामुळे आरोग्य संचालकांनी तो प्रस्ताव नामंजूर केला. त्यामुळे या भागात आता चांगले रस्ते आणि पुलांची उभारणी करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.
दुर्गम भागात रस्ते निर्मितीच्या बाबतीत नक्षलवाद्यांचे अडथळे, वन कायद्याच्या अडचणी या दोन प्रमुख अडचणी आहेत. त्यावर मात करून प्रशासकीय आणि राजकीय स्तरावरून पुढाकार घेतल्यास रस्ते-पुलांची अडचण दूर होऊ शकते. मात्र वर्षानुवर्षे त्याबाबत उदासीनता कायम राहिल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. सरकारी रुग्णवाहिका गावात जात नाही. पर्याय म्हणून बुलेटसारख्या मजबूत बाईकला तीनचाकी बनवून रुग्णाला मागील सीटच्या बाजुला तयार केलेल्या जागेत बसवून आणल्यास रुग्णांचा पायी चालण्याचा किंवा खाटेची कावड करून त्यावरून आणण्याचा त्रास वाचू शकतो म्हणून बाईक अॅम्ब्युलन्सचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य विभागाने दिला होता. त्यासाठी बाईक अॅम्ब्युलन्सच्या विविध मॉडेल्सचीही माहिती दिली होती, परंतू तो त्याबाबतचा प्रस्ताव अमान्य करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांनी सांगितले.