गाढवी नदीवर बॅरेज बांधण्याचा प्रस्ताव धूळखातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:37 AM2021-02-24T04:37:36+5:302021-02-24T04:37:36+5:30
उद्योग विरहित गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याने येथील नागरिकांच्या उपजीविकेचे एकमेव साधन म्हणून शेती व्यवसायाकडे पाहिल्या जाते. ...
उद्योग विरहित गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याने येथील नागरिकांच्या उपजीविकेचे एकमेव साधन म्हणून शेती व्यवसायाकडे पाहिल्या जाते. देसाईगंज तालुक्यासह आरमोरी तालुक्याच्या काही भागातून गाढवी नदी वाहत असल्याने नदीचे वाहते पाणी अडवून जिरवण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. विशेष बाब अशी की या नदीवर काही ठरावीक अंतरावर बारमाही रस्त्याने गावे जोडण्यासाठी बांधण्यात आलेल्या जुन्या छोट्या मोठ्या पुलांचे पिलर धूळखात पडून आहेत. त्या अनुषंगाने आमदार गजबे यांनी उपलब्ध पिलरांचा आधार घेऊन ठरावीक अंतरावर किमान तीन मीटर उंचीचे बॅरेज बांधण्यात आल्यास नदीचे वाहते पाणी अडविले जाऊन जमिनीत मुरवणे शक्य असल्याचे वारंवार शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाची सोय उपलब्ध होण्यासह लगतच्या गावातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्नही निकाली काढणे शक्य आहे. यास्तव आमदार गजबे यांनी विधानसभेत,राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून व नागपूरच्या जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र लोकाभिमुख या उपक्रमाकडे शासकीय स्तरावरुन लक्षच देण्यात येत नसल्याने व अनावश्यक त्या ठिकाणी कोल्हापूर बंधारे, शेततळी यावर अनावश्यक खर्च केला गेल्याने शासनाच्या कोट्यवधीच्या निधीचा अपव्यय हाेत आहे. बॅरेज बांधण्यात आल्यास नदीचे वाहते पाणी अडविले गेल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होण्यासोबतच आवश्यक त्या प्रमाणात सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यास येथील शेतकरी बारमाही पीक घेऊन आर्थिक उन्नत होऊ शकतात. यास्तव देसाईगंज, आरमोरी तालुक्यातून वाहणाऱ्या गाढवी नदीसह गडचिरोली जिल्ह्यात वाहणाऱ्या नद्यांवर याच धर्तीवर कोल्हापूर बंधारे, बॅरेज बांधून भविष्यात उद्भवू पाहणाऱ्या जल संकटावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांसह नागरिकांना उपयुक्त ठरणारा महत्वाकांक्षी उपक्रम मार्गी लावण्याची गरज असल्याचे यामुळे बोलले जाऊ लागले आहे.