सीटी स्कॅनचा प्रस्ताव सहा महिन्यांपासून धूळखात
By admin | Published: June 13, 2017 12:41 AM2017-06-13T00:41:13+5:302017-06-13T00:41:13+5:30
थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयातील सीटीस्कॅन मशीन बंदस्थितीत असल्याने या सेवेअभावी जिल्हाभरातील रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यात एकाही ठिकाणी शासकीय यंत्रणेमार्फत सुविधा नाही : गरीब, गरजू रुग्णांना गाठावे लागते चंद्रपूर, नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयातील सीटीस्कॅन मशीन बंदस्थितीत असल्याने या सेवेअभावी जिल्हाभरातील रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. खासगी सीटीस्कॅन केंद्रात जाऊन महागडे शुल्क भरण्याची कुवत नसलेल्या शेकडो रुग्णांना सीटीस्कॅन करण्यासाठी चंद्रपूर व नागपूर येथील शासकीय रुग्णालय गाठावे लागत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून नव्या सीटीस्कॅन मशीनचा प्रस्ताव राज्याच्या आरोग्य संचालकाकडे धूळखात पडला आहे. सदर प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा मुख्यालयी एकमेव जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. याशिवाय चामोर्शी, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, धानोरा, आष्टी, एटापल्ली, अहेरी येथेही ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये आहेत. मात्र या रुग्णालयात सीटीस्कॅन सेवेचा अभाव आहे. त्यामुळे गडचिरोली येथे शासकीयस्तरावर एकमेव ठिकाणी असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सीटीस्कॅन काढण्यासाठी जिल्हाभरातील रुग्णांची गर्दी होत होती. मात्र येथीलही सीटीस्कॅन सेवा गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने रुग्णांची मोठी पंचाईत झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात काही मोजक्या खासगी रुग्णालयात सीटीस्कॅनची सुविधा आहे. मात्र शुल्क भरून शकणारे रुग्णच या ठिकाणी या सेवेचा लाभ घेऊ शकतात. बीपीएलधारक, गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील एखाद्या रुग्णास सीटीस्कॅन काढावयाचा असल्यास त्याला चंद्रपूर व नागपूर येथील शासकीय रुग्णालय गाठावे लागते. परिणामी अहेरी, एटापल्ली, भामरागड, कोरची यासारख्या दूरवरून येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांवर प्रवास खर्चाचा भूर्दंड बसतो.
त्यामुळे गडचिरोली जिल्हा मुख्यालयी तत्काळ सीटीस्कॅन सेवा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. शासनाने यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती असलेल्या रुग्णांनाही सीटीस्कॅन सेवेसाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र या गंभीर प्रश्नाकडे राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे.
लोकप्रतिनिधी अजूनही सुस्त
गेल्या अनेक महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यात सीटीस्कॅनची सुविधा उपलब्ध नाही. यासंदर्भात अनेक नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे वारंवार माहिती दिली. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाबाबत शासनस्तरावर जोरदार पाठपुरावा करण्यास कमी पडले आहेत. लोकप्रतिनिधींचा शासनदरबारी फारसा प्रभाव पडत नसल्यानेच जिल्ह्यात आरोग्याची समस्या बिकट झाली आहे, अशी चर्चा सुरू आहे. अनेक शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभाव आहे, त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शासनातर्फे देण्यात आलेल्या सीटीस्कॅन मशीनला दहा वर्षांचा कालावधी उलटला. सदर मशीनची मुदत संपल्याने ही मशीन बंद पडली. गेल्या सात-आठ महिन्यांपासून सीटीस्कॅन मशीन बंद आहे. राज्याच्या आरोग्य संचालकांकडे नवी सीटीस्कॅन मशीन उपलब्ध होण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनामार्फत प्रस्ताव पाठविला आहे. मात्र शासनाने अद्यापही गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी नवी सीटीस्कॅन मशीन पाठविली नाही. यासंदर्भात शासनाकडे आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
- डॉ. प्रमादे खंडाते, जिल्हा शल्यचिकित्सक,
जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली