'अन्न व औषधी'मध्ये ४०० जागांच्या पदभरतीचा प्रस्ताव; मंत्री संजय राठोड यांची गडचिरोलीत माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2022 10:41 AM2022-10-01T10:41:38+5:302022-10-01T10:44:46+5:30
शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या शिवगर्जना यात्रेच्या निमित्ताने ते येथे आले असताना पत्रकारांशी बोलत होते.
गडचिरोली : नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा राज्यभरातील कारभार सध्या जेमतेम ५०० लोकांवर सुरू आहे. या विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने कामावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे ४०० जागांच्या भरतीसाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव दिला असल्याची माहिती राज्याचे नवनिर्वाचित अन्न व औषध प्रशासनमंत्री संजय राठोड यांनी गडचिरोलीत बोलताना दिली.
शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या शिवगर्जना यात्रेच्या निमित्ताने ते येथे आले असताना पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पक्षाचे विदर्भ संपर्कप्रमुख किरण पांडव व इतर पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून आमचे सरकार काम करणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी काय करता येईल हे सुचविण्यासाठी कृषी क्षेत्राशी निगडित अभ्यास गट तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शेतकऱ्यांनी मनोबल खचून आत्महत्येचा मार्ग पत्करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
महंत सुनील महाराजांचा ‘तो’ वैयक्तिक निर्णय
बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी शुक्रवारी मुंबईत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या पक्षात प्रवेश केला. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. ते म्हणजे समाज नाही. बंजारा समाजाचे लोक वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये आहेत. त्यामुळे फारसा फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय राठोड यांनी दिली.