रस्ते व पुलांच्या कामांचे प्रस्ताव मार्गी लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:09 AM2021-02-06T05:09:07+5:302021-02-06T05:09:07+5:30
देसाईगंज : आरमोरी विधासभा क्षेत्रात येणाऱ्या सर्व शहरी ग्रामीण भागातील दुरवस्था झालेले रस्ते व पुलाची कामे मार्गी लावणार, अशी ...
देसाईगंज : आरमोरी विधासभा क्षेत्रात येणाऱ्या सर्व शहरी ग्रामीण भागातील दुरवस्था झालेले रस्ते व पुलाची कामे मार्गी लावणार, अशी ग्वाही आ. कृष्णा गजबे यांनी ४ फेब्रुवारीला दिली.
सार्वजनिक विभाग क्र. १ गडचिरोलीद्वारा विशेष रस्ते दुरुस्ती कार्यक्रम २०१९-२० अंतर्गत भूमिपूजन सोहळा पार पडला. देसाईगंज, नैनपूर, कोकडी, विठ्ठलगाव, पिंपळगाव (ह.) जिल्हा सीमा रस्ता विशेष दुरुस्ती करण्यासाठी २ काेटी ७६ लाख २६ हजार ३८५ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन आमदारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पं.स. सभापती शेवंता अनोले, उपसभापती शेवंता अवसरे, जि.प. सदस्य रमाकांत ठेंगरे, पं.स. सदस्य अशोक नंदेश्वर, माजी पं.स. सदस्य शिवाजी राऊत, दूधराम हरडे उपस्थित होते. देसाईगंज, आरमोरी, कोरची, कुरखेडा तालुक्यांतील ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काही भागात रस्तेदुरुस्ती कामाला वेग आला आहे. येत्या काही दिवसांत नादुरुस्त रस्ते व पुलाचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीकरिता पाठविणार असल्याचे आ. गजबे यांनी यावेळी सांगितले.