काळे झेंडे दाखवत व्यक्त केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2022 05:00 AM2022-05-04T05:00:00+5:302022-05-04T05:00:42+5:30
तेलंगणा सरकारने उभारलेल्या या प्रकल्पासाठी राज्यात सत्तारूढ असलेल्या तत्कालीन भाजप सरकारने सर्व प्रकारची मदत केली होती. आता भाजपचेच पदाधिकारी या प्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी आंदोलनाची भूमिका घेत असल्याने हा या भागात चर्चेचा विषय झाला आहे. काही दिवसांपूर्वीच आ.डाॅ.देवराव हाेळी यांनीही हा प्रकल्प पांढरा हत्ती असल्याची टीका केली हाेती.
लाेकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तेलंगणा सरकारने तीन वर्षांपूर्वी गोदावरी नदीवर उभारलेल्या मेडीगड्डा बॅरेज या भव्य सिंचन प्रकल्पाचे पाणी महाराष्ट्राच्या हद्दीतील लगतच्या शेतांमध्ये शिरून दरवर्षी जमीन खरडून निघत आहे. या शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाईसुद्धा मिळालेली नाही. त्यामुळे १ मे या महाराष्ट्र दिनी शेतकऱ्यांनी धरणाच्या परिसरात काळे झेंडे दाखवीत निषेध नोंदविला.
८५ दरवाजे असणाऱ्या या प्रकल्पाचे पाणी हैदराबादपर्यंत नेले जात असले तरी प्रकल्पाला लागून असलेल्या महाराष्ट्राच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या पिकासाठी थेंबभरही पाणी मिळत नाही. मात्र, धरणाचे दरवाजे बंद केल्यानंतर बॅकवॉटर लगतच्या शेतांमध्ये शिरून मोठे नुकसान होते. याकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासकीय यंत्रणा लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे भाजपच्या आदिवासी आघाडीचे प्रदेश सदस्य संदीप कोरेत यांच्या नेतृत्वात सीमावर्ती गावातील शेतकऱ्यांनी रविवारी सायंकाळी काळे झेंडे दाखवीत घोषणाबाजी करून निषेध नोंदविला. पीडित शेतकऱ्यांना लांबपल्लीच्या धर्तीवर भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. सदर प्रश्नांबाबत शासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.
भाजपचाच पाठिंबा, भाजपकडूनच निषेध
- तेलंगणा सरकारने उभारलेल्या या प्रकल्पासाठी राज्यात सत्तारूढ असलेल्या तत्कालीन भाजप सरकारने सर्व प्रकारची मदत केली होती. आता भाजपचेच पदाधिकारी या प्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी आंदोलनाची भूमिका घेत असल्याने हा या भागात चर्चेचा विषय झाला आहे.
- काही दिवसांपूर्वीच आ.डाॅ.देवराव हाेळी यांनीही हा प्रकल्प पांढरा हत्ती असल्याची टीका केली हाेती.