हवाई सफरसाठी प्रथमेशची निवड
By admin | Published: June 21, 2017 01:34 AM2017-06-21T01:34:42+5:302017-06-21T01:34:42+5:30
‘लोकमत संस्काराचे मोती’ या शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या महत्वपूर्ण उपक्रमांतर्गत
लोकमत संस्काराचे मोती स्पर्धा : आज दिल्लीला विमानवारी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ‘लोकमत संस्काराचे मोती’ या शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या महत्वपूर्ण उपक्रमांतर्गत गतवर्षीच्या कुपवरील ‘लकी ड्रॉ’ मध्ये नागपूर-दिल्ली या हवाई सफरसाठी प्रथमेश रमेश बोरकुटे या विद्यार्थ्याची निवड झाली आहे. तो गडचिरोली येथील स्कूल आॅफ स्कॉलर्स शाळेमध्ये इयत्ता सातव्या वर्गात शिकत आहे. बुधवार दि.२१ रोजी तो लोकमत चमूसोबत दिल्लीला विमानाने जाणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांच्या ज्ञानात भर पडून चांगले संस्कार व्हावेत या उद्देशाने लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने ‘संस्कारांचे मोती’ हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाअंतर्गत गतवर्षी १ जुलै ते १० आॅक्टोबर या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी कुपनसह स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक शाळांनी सहभाग नोदविला. यातील विजेत्या विद्यार्थ्यांना लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने अनेक बक्षीसे व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात करण्यात आले. यात गडचिरोली जिल्ह्यातून हवाई सफरसाठी स्कूल आॅफ स्कॉलर्सचा विद्यार्थी प्रथमेश रमेश बोरकुटे याची निवड झाली आहे.
ही हवाई सफर नागपूर ते दिल्ली अशी होणार असून २१ जूनला सकाळी नागपूरवरून सर्व विजेते स्पर्धक दिल्लीसाठी रवाना होतील. त्यांचा संपूर्ण खर्च लोकमत करणार आहे.