शेतीपूरक प्रशिक्षण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:38 AM2021-02-11T04:38:22+5:302021-02-11T04:38:22+5:30
घोट : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून काही गावांमध्ये लाख शेतीचे प्रशिक्षण शेतक-यांना देण्यात आले. शेतक-यांना लाख ...
घोट : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून काही गावांमध्ये लाख शेतीचे प्रशिक्षण शेतक-यांना देण्यात आले. शेतक-यांना लाख शेतीचे प्रशिक्षण दिल्यास नवीन रोजगार उपलब्ध होईल, त्यामुळे प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी घोट परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
कव्हरेजची समस्या
धानोरा : दुर्गम भागात बीएसएनएलचे अत्यंत कमी टॉवर आहेत. त्यामुळे या परिसरातील भ्रमणध्वनींना कव्हरेज मिळत नाही. बीएसएनएलचे जिल्ह्यात सर्वाधिक ग्राहक असून जास्तीतजास्त टॉवर उभारण्याची आवश्यकता आहे. कव्हरेजची समस्या गंभीर आहे.
रेतीअभावी घरकुलांचे बांधकाम ठप्प
कुरूड : देसाईगंज तालुक्याच्या कुरूड, काेंढाळा परिसरातील बहुतांश घरकुलांचे बांधकाम रेतीअभावी ठप्प पडले आहेत. मागील वर्षी रेती घाटांचे लिलाव न झाल्याने नागरिक अडचणीत आले आहे. यावर्षी तरी लवकर रेती घाटांचे लिलाव करावे, अशी मागणी हाेत आहे.
बसथांब्यानजीक शौचालय बांधा
चामोर्शी : तालुक्यातील लखमापूर बोरी बसथांब्यावर भेंडाळा, मूल, चामोर्शी, आष्टी, गोंडपिंपरी व चपराळा आदी ठिकाणांसाठी दररोज बस जातात. या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे येथे शौचालय व मूत्रीघर उभारण्यात यावे, अशी मागणी हाेत आहे.
तोडसा येथे भ्रमणध्वनी टॉवर उभारा
एटापल्ली : तालुक्यातील तोडसा येथे बीएसएनएल टॉवर उभारावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. एटापल्ली तालुक्यात बीएसएनएलचे कव्हरेज राहत नसल्याने नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येऊन अनेक कामे करावी लागतात.
रुग्णालयाचा दर्जा द्या
कुरखेडा : मालेवाडा परिसर आजही शासन व प्रशासनाच्या नजरेत दुर्लक्षित आहे. या भागात ५० किमीच्या परिसरात केवळ एकच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी आहे. परंतु, या मागणीकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्षच आहे.
फवारणीची मागणी
गडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त असून अनेक आजार पसरत आहेत. म्हणून, डासनिर्मूलनासाठी फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. डासांमुळे आजार बळावण्याची शक्यता आहे.
आमगाव मार्गाची दुर्दशा
चामोर्शी : तालुक्यातील भिवापूर क्रॉसिंग-आमगाव (महल)-नेताजीनगर हा १५ किमीचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. डांबर निघून मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होत असल्याने सदर मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रसायनयुक्त फळविक्री
गडचिरोली : रासायनिक औषध वापरून फळ पिकविणाऱ्या शहरातील व्यापाऱ्यांवर अन्न, औषध प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. उन्हाळ्यात फळांची विक्री प्रचंड वाढते. याचा फायदा घेऊन अनेक विक्रेते औषध वापरून फळ पिकवितात. त्यामुळे आराेग्याला धाेका आहे.
आष्टीत डुकरांचा हैदाेस
आष्टी : येथे सध्या मोकाट डुकरांची संख्या वाढली आहे. नागरिकांना डुकरांचा त्रास सहन करावा लागत आहे. गावातील वाॅर्डात सकाळी डुकरे कळपाने फिरताना दिसतात. रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक बसून वाहनधारक पडलेले आहे. त्यामुळे डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
वेलतूर मार्गावर झुडुपे
चामोर्शी : तालुक्यातील एकोडी-वेलतूर तुकूम मार्गावरील दुतर्फा काटेरी झुडुपांची वाढ मोठ्या प्रमाणावर झाल्याने या झाडांमुळे वाहतुकीस अडथळा येत आहे. यातून अपघात होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे सदर झुडपे त्वरित तोडावीत, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
दिशादर्शक फलक बेपत्ता
एटापल्ली : अहेरी उपविभागातील मार्गावर लावण्यात आलेले अनेक ठिकाणचे दिशादर्शक फलक बेपत्ता झाले आहे. यामुळे रात्री अनोळखी नागरिक तसेच वाहनचालक रस्ता विसरून भलतीकडेच वळतात. संबंधित यंत्रणेने अशा ठिकाणी दिशादर्शक फलक लावावे, अशी मागणी होत आहे.
सिंचन क्षेत्रात घट
देसाईगंज : तालुक्यातील अनेक मामा तलावांमध्ये सभोवतालच्या शेतक-यांनी अतिक्रमण करून त्यामध्ये धानाच्या बांध्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे जलपातळीत घट झाली आहे. सदर अतिक्रमण हटविण्याकडे सिंचन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तलावातील सिंचन क्षेत्रही घटत आहे.
कुशल मजूर मिळेना
चामोर्शी : विविध कुशल कामे करताना बांधकाम करण्यासाठी कुशल मजुरांची आवश्यकता आहे. मात्र, कुशल मजुरांची कमतरता आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये दरवर्षी कुशल कामगारांचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे कुशल कामे वेळीच हाेत नाही. बाहेरगावावरून कुशल कामगारांना बाेलवावे लागते.
तंत्रशिक्षणाचा अभाव
सिरोंचा : कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शासनाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था व इतर तंत्रशिक्षण संस्था निर्माण केल्या असल्या तरी, यातील अभ्यासक्रम पूर्णपणे कालबाह्य झाले आहे. त्याचबरोबर यातील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे युवकांना तंत्रशिक्षणाचे धडे मिळण्यास अडचणी येत आहेत.