धान खरेदीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:37 AM2021-02-10T04:37:12+5:302021-02-10T04:37:12+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत तालुक्यातील दवंडी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत आधारभूत धान ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत तालुक्यातील दवंडी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू असून, या केंद्रांवर माेठ्या प्रमाणात धानाची खरेदी करण्यात आली. खरेदी करण्यात आलेला धान मोकळ्या जागेत साठवून ठेवण्यात आला असल्याने धान खरेदी करण्यासाठी आता पुरेशी जागा शिल्लक नसल्याने धान खरेदी प्रभावित झाली आहे. त्यामुळे धान खरेदीसाठी जागा व व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी आरमोरी विधानसभा युवक काॅंग्रेसच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत दवंडी येथे धान खरेदी केंद्र सुरू आहे. या खरेदी केंद्रांतर्गत भाकरोंडी, देवखडकी, भान्सी, बाजीराव टोला, जांभळी, जांभळी टोला, पिसेवडधा आदी गावे येतात. खरेदी केंद्रावर माेठ्या प्रमाणात धानाची खरेदी करण्यात आली आहे. खरेदी केलेल्या धानाची साठवणूक करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाकडे गुदामाची पुरेशी व्यवस्था नसल्याने खरेदी केलेला धान उघड्यावर पडून आहे.
खरेदी केलेल्या धानाची अद्यापही उचल करण्यात आली नसल्याने खरेदी केंद्राच्या ठिकाणी नवीन खरेदी करण्यासाठी जागा शिल्लक नाही आणि परिसरातील इतर अनेक शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी बाकी आहे. जागा उपलब्ध न झाल्यास पुढे धान खरेदी केंद्र बंद पडण्याची शक्यता आहे. दवंडी येथील खरेदी करण्यात आलेल्या धानाची तात्काळ उचल करण्यात यावी व शिल्लक असलेल्या शेतकऱ्याचा धानाची खरेदी करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना युवक काँग्रेसचे महासचिव सारंग जांभुळे, गोकुळ खरवडे, रेवनाथ बोरुले आदी उपस्थित हाेते.