लसीकरणाला गती देण्यासोबत रुग्णांना योग्य सुविधा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:47 AM2021-04-30T04:47:00+5:302021-04-30T04:47:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यात कोरोना उपचारासाठी एकही खासगी रुग्णालय नसताना सर्व कोरोना रूग्णांना आरोग्य सेवा देऊन जिल्हा ...

Provide appropriate facilities to patients while speeding up vaccination | लसीकरणाला गती देण्यासोबत रुग्णांना योग्य सुविधा द्या

लसीकरणाला गती देण्यासोबत रुग्णांना योग्य सुविधा द्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

गडचिरोली : जिल्ह्यात कोरोना उपचारासाठी एकही खासगी रुग्णालय नसताना सर्व कोरोना रूग्णांना आरोग्य सेवा देऊन जिल्हा सामान्य रूग्णालयाने जिल्ह्याची गरज पूर्ण केली आहे, अशा शब्दात राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तथा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले. यासोबतच उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेऊन रुग्णांना योग्य त्या सुविधा द्या आणि लसीकरणात मागे असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात याला गती द्या, अशी सूचनाही त्यांनी केली.

ना. वडेट्टीवार यांनी गुरूवारी (दि. २९) जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन कोरोनाबाबतची सद्यस्थिती व विविध उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी विधानपरिषद सदस्य अभिजीत वंजारी, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, जिल्हा परिषद सदस्य ॲड. राम मेश्राम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोळंकी, डॉ. मुकुंद ढबाले उपस्थित होते.

यावेळी ना. वडेट्टीवार यांनी ऑक्सिजन, रेमडेसिविर, बेड्सची उपलब्धता याबाबतची माहिती जाणून घेतली. त्यांनी जिल्ह्यातील रूग्णांना आवश्यक मदत देण्यासाठी सहकार्य करा व रूग्णांची तपासणी प्रोटोकॉलनुसार करून चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी पुढाकार घ्या, असे निर्देश उपस्थित आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. यावेळी त्यांनी कोरोना वाॅर्डाबाहेर जावून त्याठिकाणची पाहणी केली.

(बॉक्स)

मृत्यू संख्या व डबलिंग रेटबद्दल चिंता

यावेळी घेतलेल्या बैठकीत ना. वडेट्टीवार म्हणाले, जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बरा आहे. मात्र, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या नियंत्रणात येणे आवश्यक आहे. डबलिंग रेटही खूप जास्त वाढला असून, आपल्याला संसर्ग साखळी तोडण्यासाठी रूग्णांच्या संपर्कातील इतरांचा शोध घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्याला लसींचा पुरवठा कमी असला, तरी लसीकरणाची टक्केवारी राज्याच्या तुलनेत कमी आहे. आता नागरिकांना लसीकरणाची गरज लक्षात आली आहे. लसींचा पुरवठा पूर्ववत झाल्यावर लसीकरण वाढविणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

चांगले जेवण व कुलरची व्यवस्था करा

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. रूग्णांना चांगले जेवण व पुरेशी झोप मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटर्समध्ये कुलरची व्यवस्था करावी तसेच चांगल्या दर्जाचे जेवणही पुरवावे, जेणेकरून रूग्णांना संसर्गातून बरे होण्यास मदत मिळेल, अशा सूचना वडेट्टीवार यांनी केल्या. कोविड केअर सेंटरवरील अडचणी दूर करत आहोत. याबाबत तालुकास्तरावर प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रूडे यांनी सांगितले.

Web Title: Provide appropriate facilities to patients while speeding up vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.