गोरगरिबांना बँंक सेवा पुरवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 01:03 AM2018-01-03T01:03:55+5:302018-01-03T01:04:12+5:30
व्यावसायिक दृष्टीकोन सांभाळतांनाच गडचिरोली जिल्ह्यातील गरीब, आदिवासी, मजूर व ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांच्या प्रगतीसाठी बँक सेवा देण्यावर विशेष भर द्यावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : व्यावसायिक दृष्टीकोन सांभाळतांनाच गडचिरोली जिल्ह्यातील गरीब, आदिवासी, मजूर व ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांच्या प्रगतीसाठी बँक सेवा देण्यावर विशेष भर द्यावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांनी केले.
कुरखेडा तालुक्यातील रामगड येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेची इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.कृष्णा गजबे होते. प्रमुख अतिथी म्हणून नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, संचालक खेमनाथ डोंगरवार, खुशाल वाघरे, ब. सो. ऐलावार, हि. जे. वालदे, जा. तू. खेडकर, भैय्याजी वाढई, हरिश्चंद्र डोंगरवार, नागीलवार, जिल्हा परिषद सदस्य भाग्यवान टेकाम, रामगडच्या सरपंच वच्छलाबाई केरामी, चांगदेव फाये आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आ.गजबे म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्हाभर दुर्गम भागात बँकेच्या शाखा कार्यान्वित केल्या आहेत. जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान देत आहे, असे मार्गदर्शन केले. संचालन व प्रास्ताविक मुख्य व्यवस्थापक अरूण निंबेकर तर आभार खेमनाथ डोंगरवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी व्यवस्थापक टी. डब्ल्यू. भुरसे, अविनाश मुर्वतकर, रोषण डोंगरवार, महाजन यांनी सहकार्य केले.
सहकारी बँकेकडे १३०० कोटींच्या ठेवी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे १ हजार ३०० कोटी रूपयांच्या ठेवी आहेत. जिल्ह्यातील ग्राहकांचा विश्वास बँकेवर वाढत चालला आहे. संपूर्ण संचालक मंडळ व कर्मचाºयांनी केलेल्या प्रगतीचे फळ दिसून येत आहेत. सर्वांगिण विकास करण्याकरिता सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विचार करणे गरजेचे आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम व ग्रामीण भागात बँकेच्या शाखा असतानाही जिल्हा मध्यवर्ती बँक राज्यातील इतर बँकांच्या तुलनेत अधिक प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी केले.
रामगड व परिसरातील नागरिकांना बँकेने सुसज्ज इमारत बांधून दिली आहे. बँक सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन खेमनाथ डोंगरवार यांनी केले.