शेवटच्या कामगारांपर्यंत लाभ पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:37 AM2018-12-08T00:37:40+5:302018-12-08T00:38:11+5:30
शेतकरी व कामगार यांच्या हितासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे प्रतिपादन आ.डॉ.देवराव होळी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : शेतकरी व कामगार यांच्या हितासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे प्रतिपादन आ.डॉ.देवराव होळी यांनी केले.
महाराष्ट्रीय इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तसेच महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळ तथा अनुगामी लोकराज्य महाअभियान संस्था यांच्या माध्यमातून अटल विश्वकर्मा सन्मान योजना १९ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत कामगार नोंदणी अभियान राबविले जात आहे. सदर मेळावा धानोरातही आयोजित करण्यात आला. याप्रसंगी आ.डॉ.देवराव होळी मार्गदर्शन करीत होते. शिबिराला तहसीलदार महेंद्र गणवीर, जिल्हा कामगार अधिकारी रवींद्र उईके, अनुलोम संस्थेचे उपविभाग प्रमुख संदीप लांजेवार, सारंग साळवे, भाग जनसेवक रवी कोल्हटकर आदी उपस्थित होते. मेळाव्याला तालुक्यातील शेकडो कामगार उपस्थित होते. पुढे बोलताना आ.डॉ.देवराव होळी म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक कामगारांना या योजनेचा लाभ देण्यासाठी त्यांची नोंदणी करावी, यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
नोंदणी झालेल्या कामगारांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार गणवीर म्हणाले, ही योजना समाजातील प्रत्येक घटकाला डोळ्यासमोर ठेवून निर्माण करण्यात आले आहे. कामगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कामगार अधिकारी रवींद्र उईके म्हणाले की, मोठ्या संख्येने कामगारांनी नोंदणी करावी, यासाठी प्रशासनाच्या वतीने जनजागृती केली जात आहे. तरीही ज्या नागरिकांना या योजनेविषयी माहिती नाही. त्यांच्यापर्यंत इतर नागरिकांनी माहिती पोहोचवून त्यांना नोंदणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.