जिल्ह्यात माडिया भाषेत शिक्षणाची सोय करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:40 AM2021-05-25T04:40:51+5:302021-05-25T04:40:51+5:30
गडचिरोली : दुर्गम भागात माडिया भाषा बोलणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र शिक्षक व शाळा हा प्रवाह पुढे आला ...
गडचिरोली : दुर्गम भागात माडिया भाषा बोलणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र शिक्षक व शाळा हा प्रवाह पुढे आला होता. मात्र त्या शाळा सुरू झाल्या नाहीत. माडिया भाषेतून शिक्षणाची सोय करावी.
कोरची शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला
कोरची : शहरातील विविध वॉर्डांत अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
‘ती’ झाडे धाेकादायक
गडचिरोली : जिल्ह्यातील मुख्य रस्त्याच्या बाजूला झुडूप वाढलेली आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहने दिसत नाही. यामुळे अनेकवेळा अपघात घडले असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे झुडूप तोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
थ्री-जी सेवा प्रभावित
सिरोंचा : सिरोंचा येथे बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा बसविण्यात आली आहे. मात्र ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलचा इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे दिली जात आहे.
तलाव सौंदर्यीकरण करा
चामोर्शी : शहरालगत असलेल्या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. चामोर्शी शहरात फिरण्यासाठी व निवांत बसण्यासाठी प्रशस्त जागा नाही, त्यामुळे शहरातील तलावाचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी प्रशासनाकडे हाेत आहे.
पुलावर कठडे नाही
अहेरी : तालुक्यातील रायगट्टानजीक पुलावर कठडे नसल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. सदर पूल कमी उंचीचा असल्याने पुलावरून पावसाळ्यात नेहमीच पाणी असते. परिणामी अनेकदा वाहतूक ठप्प होते. त्यामुळे पुलावर कठडे लावावे, अशी मागणी आहे.
वनविभागात पदे रिक्त
गडचिरोली : जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ८० टक्के क्षेत्रफळ जंगलाने व्यापले आहे. यासाठी संपूर्ण जिल्हाभरात दोन हजारांपेक्षा अधिक वनकर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत असल्याने लाकूड तस्करी सुरू आहे.
मुद्रांक विक्रीत नागरिकांची लूट
गडचिरोली : विविध कामासाठी लागणाऱ्या मुद्रांकाची विक्री शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दराने सुरू आहे. १०० रुपये किमतीचे मुद्रांक ११०, ५०० रुपयांचे मुद्रांक ५१० रुपयाने विकल्या जात आहे.
डिजिटल बॅनरमुळे पेंटर झाले बेराेजगार
सिरोंचा : संगणकाद्वारे विविध मल्टी कलरचे आकर्षक बॅनर मशीनद्वारे बनविण्यात येतात. ते कमी किमतीत कमी वेळात उपलब्ध होतात. त्यामुळे विविध रंगाचे डब्बे व ब्रश घेऊन दिसणारे पेंटर आता दिसेनासे झाले आहेत.
येवली येथे जलद बसचा थांबा द्या
गडचिरोली : येथून जवळच असलेल्या येवली येथे जलद बसथांबा आहे. मात्र गडचिरोली आगाराच्या बसगाड्या व्यतिरिक्त इतर आगाराच्या जलद बसगाड्या येथे थांबत नाहीत. त्यामुळे नागरिकांना गडचिरोली आगारात बसगाडी बदलावी लागत आहे. त्यामुळे येथे जलद बसथांबा देण्याची मागणी होत आहे.
लोंबकळणाऱ्या तारांमुळे वाढला धोका
धानोरा : शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच इतरही वॉर्डांमध्ये विजेच्या तारा लोंबकळत आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी वीज विभागाकडे तक्रारही केली आहे. मात्र वीज वितरण कंपनीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष आहे.
कलेक्टर कॉलनीत सांडपाण्याची दुर्गंधी
गडचिरोली : शासकीय कर्मचाऱ्यांची वसाहत समजल्या जाणाऱ्या कॉम्प्लेक्स परिसरातील कलेक्टर कॉलनीतील ड्रेनेज लाइन फुटली आहे. त्यामुळे सांडपाण्याची दुर्गंधी येत आहे. सातत्याने मागणी करूनही पालिका प्रशासनाचे समस्यांकडे दुर्लक्ष आहे.
सट्टापट्टीसाठी इंटरनेटचा वापर वाढला
कुरखेडा : तालुक्यासह जिल्हाभरातील शहरी भागात सट्टापट्टीचे नंबर पाहण्यासाठी मोबाइलद्वारे इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. अनेक लोक भ्रमणध्वनीवर इंटरनेटद्वारे सट्टापट्टीचे नंबर शोधताना दिसून येतात. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
गोगाव-पिपरटोला मार्गाची दुरुस्ती करा
गडचिरोली : तालुक्यातील गोगाव-पिपरटोला या मार्गाची अनेक दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सदर मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
आलापल्ली येथे गतिरोधक निर्माण करा
आलापल्ली : येथील नागमाता मंदिरात भाविकांची गर्दी दर्शनासाठी दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु या मार्गाने भरधाव वाहनांचे आवागमन असते. येथे गतिरोधक उभारावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावरून दुचाकी, चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांचेही आवागमन असते.
सीमावर्ती भागात गुटखा विक्री सुरूच
अहेरी : जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात गुटखा विक्री सुरूच असल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड, आंध्र प्रदेश या राज्यांतून अवैध गुटखा विक्रीस आणल्या जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
आलापल्ली येथे बंधाऱ्याचे बांधकाम करा
आलापल्ली : परिसरातील गावांमध्ये कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम करावे, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे. गावात अल्प हातपंप सुरू असल्याने येथे नव्याने हातपंपही निर्माण करावे, अशी मागणी आहे. या भागात सिंचन सुविधा ताेकड्या असल्याने याचा परिणाम दाेन्ही हंगामातील विविध पिकांवर हाेत आहे.
खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था
धानोरा : तालुक्यातील खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या प्रवासी निवारा दुरवस्थेत आहे. निर्मितीपासून प्रवासी निवाऱ्याचे अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे सदर प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती करावी.
रस्त्यालगत वाहनांवर कारवाई करा
गडचिरोली : गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात अगदी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जातात. सदर वाहनांवर कारवाई होत नसल्याने. वाहने रस्त्यावर लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनांवर कारवाई करण्याची मागणी आहे.
ग्रामीण भागात पेट्रोलची अवैध विक्री सुरूच
गडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार विक्रीसाठी शहरातील पेट्रोलपंपावरून ठोक स्वरूपात पेट्रोल नेऊन ठेवतात. गरजू दुचाकीस्वारांकडून एका लिटरमागे २० ते ३० रुपये जादा उकळतात.
शहरातील अनेक वॉर्डात सट्टापट्टी जोमात
देसाईगंज : शहरात सट्टापट्टी जोमात सुरू आहे. अनेक युवक सट्टापट्टीच्या नादात लागले आहेत. शहरात शेकडो एजंट सट्टापट्टीची वसुली करीत आहेत. मात्र याकडे देसाईगंज पोलिसांचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते. सकाळपासूनच सट्टापट्टी लावण्यास सुरुवात होते.
कोरची तालुक्यातील अनेक शाळा विजेविनाच
कोरची : शासनाच्या आग्रहानंतर शाळांनी डिजिटल साधने खरेदी केले आहेत. मात्र शाळेमध्ये वीजपुरवठा नसल्याने सदर साहित्य धूळखात पडून आहेत. काही शाळांना वीजपुरवठा होता. मात्र वीजबिल भरला नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे आता संबंधित शाळा विजेविनाच सुरू आहेत. डिजिटल साधनांचा पुरेपूर वापर करण्यासाठी शाळांमध्ये वीजपुरवठा आवश्यक झाला आहे.
विटा बनविण्याच्या कामास वेग
देसाईगंज : उन्हाळ्याला सुरुवात झाली असल्याने घर बांधकामाला ग्रामीण भागात वेग आला आहे. देसाईगंज तालुक्यात विटांची निर्मिती केली जाते. हिवाळ्यात विटा बनविण्यासाठी पाेषक वातावरण असल्याने विटा बनविण्याच्या कामास वेग आला आहे.
गौरक्षण संस्थेच्या निर्मितीची मागणी
गडचिरोली : गडचिरोली शहरात गोरक्षण संस्था नाहीत. त्यामुळे अनेकदा बेवारस जनावरे तसेच कत्तलीसाठी जात असलेले जनावर पकडून चंद्रपूर जिल्ह्यात लोहारा येथे पाठवावे लागतात. गौरक्षण संस्था निर्माण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
जि. प.समोरील अतिक्रमण वाढतीवरच
गडचिरोली : जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजूला काही दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. मात्र या दुकानदारांवर कोणतीही कारवाई बांधकाम विभाग तसेच नगर परिषद प्रशासन करीत नसल्याने या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जागा पकडून दुकाने थाटली जात आहेत.
सभागृहाच्या मागे घाणीचे साम्राज्य
गडचिरोली : स्थानिक इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहाच्या मागील परिसरात मोठ्या प्रमाणात घाण पसरली असून याकडे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. या परिसरातील दुकानदार याच ठिकाणी लघुशंकेसाठी जातात व दुकानातील कचराही टाकतात.
मालेवाडा परिसर समस्यांच्या गर्तेत
कुरखेडा : कोरची व धानोरा या दुर्गम भागांना जोडणारा मालेवाडा परिसर आजही शासन व प्रशासनाच्या नजरेत दुर्लक्षित आहे. या भागात ५० किमीच्या परिसरात केवळ एकाच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भरवशावर आरोग्य सेवा आहे.