नवोदय विद्यालयाला सुविधा पुरवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:43 PM2019-02-11T22:43:26+5:302019-02-11T22:43:43+5:30
चामोर्शी तालुक्यातील घोट येथे असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयात भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्या, यासाठी खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना निवेदन देऊन पाठपुरावा सुरू केला आहे. सदर विद्यालयातील समस्यांकडे आठवडाभरापूर्वीच ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते हे विशेष.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील घोट येथे असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयात भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्या, यासाठी खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना निवेदन देऊन पाठपुरावा सुरू केला आहे. सदर विद्यालयातील समस्यांकडे आठवडाभरापूर्वीच ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते हे विशेष.
या विद्यालयात शिक्षकांची पदे रिक्त आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होत आहे. नवोदय विद्यालयाच्या इमारतीला संरक्षण भिंत नाही. त्यामुळे जंगली व पाळीव प्राणी यांच्यापासून विद्यार्थ्यांना धोका आहे. शाळेची जुनी इमारत जीर्णावस्थेत पोहोचली आहे. शिक्षकांना निवासस्थाने उपलब्ध नसल्याने गावात खोली करून राहावे लागत आहे. शिक्षकांची निवासस्थाने विद्यालयाच्या आवारातच असती तर विद्यार्थ्यांवर नियंत्रण राहण्यास मदत झाली असती.
घोट येथे एखाद्या शिक्षकाची बदली झाल्यानंतर तो शिक्षक दुसऱ्या ठिकाणी बदलीसाठी प्रयत्न करतो. मात्र कारण नसेल तर अशा शिक्षकांची घोटवरून इतर ठिकाणी बदलू करू नये. विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क आकारले जात आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. शुध्द पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. घोट येथील नवोदय विद्यालयातून अनेक किर्तीवंत विद्यार्थी घडले आहेत. ही परंपरा याही पुढे सुरू ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी निवेदनातून केली आहे.