गडचिरोलीच्या विकासासाठी ५३५ कोटींचा निधी उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:21 AM2018-09-10T00:21:45+5:302018-09-10T00:22:24+5:30
आदिवासी बहुल नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र शासनाने ५३५ कोटी १६ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी बहुल नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र शासनाने ५३५ कोटी १६ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे.
रविवारी नवी दिल्लीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. वरील मागणीच्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातील आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त, मागास जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या ३४ टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. मानव विकास निर्देशांकात सुध्दा सदर जिल्हा मागे आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न सुध्दा कमी आहे. या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्याची तसेच जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करीत मानव विकास निर्देशांक सुध्दा वाढविण्याची आवश्यकता आहे. या दृष्टीने गडचिरोली जिल्ह्यात रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी २०० कोटी रूपये, मोबाईल तसेच इंटरनेट कनेक्टीव्हिटी ४५ कोटी ४२ लाख रूपये, सिंचन व्यवस्थेसाठी ३६ कोटी रूपये, पोलीस यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी १० कोटी १४ लाख रूपये, गोंडवाना विद्यापीठासाठी २४० कोटी रूपये निधी याप्रमाणे ५३५ कोटी १६ लाख रूपये निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात यावा, अशी मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजनाथ सिंह यांच्याकडे केली. सदर मागणी तपासून निधीच्या उपलब्धतेबाबत प्राधान्याने कार्यवाही करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले.