निराधार योजनेचे अनुदान नियमित द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:24 AM2021-07-20T04:24:56+5:302021-07-20T04:24:56+5:30

रांगी : निराधार याेजनांचे अनुदान नियमित द्यावे, अशी मागणी निराधारांनी केली आहे. अनेकदा अनुदान थकीत असते. त्यामुळे लाभार्थ्यांना अडचण ...

Provide Niradhar Yojana grants regularly | निराधार योजनेचे अनुदान नियमित द्या

निराधार योजनेचे अनुदान नियमित द्या

Next

रांगी : निराधार याेजनांचे अनुदान नियमित द्यावे, अशी मागणी निराधारांनी केली आहे. अनेकदा अनुदान थकीत असते. त्यामुळे लाभार्थ्यांना अडचण जाणवते. लाभार्थी बँकेत दररोज पैशासाठी चकरा मारतात. यातही त्यांना बराच त्रास हाेताे. त्यामुळे निराधार याेजनेचे अनुदान लवकर व नियमित बँक खात्यात जमा करावे, अशी मागणी निराधारांनी केली आहे.

राजस्व अभियान सुरू ठेवण्याची मागणी

जाेगीसाखरा : तालुका प्रशासनाच्या वतीने तहसील कार्यालयात राजस्व अभियान राबविण्यात येत होते. या अभियानामुळे परिसरातील नागरिकांना विविध प्रकारचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तहसील कार्यालयातील दैनंदिन कामकाजामुळे अनेक प्रमाणपत्रे वेळेवर मिळत नाहीत. आता शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने त्यांना कागदपत्रे लागणार आहेत.

वर्दळीच्या रस्त्यावर वाढले अतिक्रमण

मुलचेरा : शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. कोरोनानंतर प्रशासनाने शिथिलता दिल्याने वाहने रस्त्यावर धावत आहेत. परंतु, रस्त्याच्या कडेला काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. लग्नाच्या खरेदीसाठी ग्राहक आता बाजारात येत आहेत. मात्र वाहने रस्त्यावरच ठेवली जात आहेत.

बोगस डॉक्टरांवर कारवाई करा

ठाणेगाव : जिल्ह्यातील काही दुर्गम गावात बोगस डॉक्टरांनी आपली दुकानदारी थाटली आहे. बोगस डॉक्टर असूनही ते रुग्णांवर उपचार करीत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खो

सिराेंचा : जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या गावातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, ग्रामपंचायत, तलाठी, प्राथमिक आरोग्य केंद्र, कृषी विभाग, वीज कर्मचारी, पंचायत समिती, तहसील कार्यालय व इतर क्षेत्रांत कार्यरत काही कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे सामान्य नागरिकांची कामे खोळंबत आहेत.

जिल्ह्यात महा-ई-सेवा केंद्र अत्यल्प

वैरागड : जिल्ह्यात महा-ई-सेवा केंद्र तोकडे आहेत. परिणामी, महा-ई-सेवा केंद्र गाठण्यासाठी ६० ते ७० किमीचे अंतर कापावे लागते. त्यामुळे महा-ई-सेवा केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे. महा-ई-सेवा केंद्रामुळे लोकांना घरबसल्या दाखले मिळणार असले तरी ही सेवा इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर अवलंबून आहे. अहेरी उपविभागात इंटरनेट कनेक्टिव्हीटीचा माेठा अभाव आहे. टाॅवर असूनही कव्हरेज राहत नाही.

डास व कीटकांमुळे आरोग्य धोक्यात

एटापल्ली : शहरातील बहुतांश वाॅर्डांतील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. ओपनस्पेसही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी डास व कीटकांची उत्पत्ती होत आहे. आरोग्य धोक्यात आले आहे. नगर परिषदेने फवारणी करून डास व कीटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

मोहझरीतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे

गडचिरोली : तालुक्यातील मोहझरी गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सदर रस्ते दुरुस्त करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. मोहझरी गावातील मुख्य मार्ग डांबरीकरणाने बनला आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

डुकरांच्या बंदोबस्ताकडे पालिकेचे दुर्लक्ष

गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली शहरातील सर्व २३ वॉर्डांत डुकरांचा हैदोस प्रचंड वाढला आहे. मात्र, पालिकेच्या वतीने डुकरांच्या बंदोबस्ताकरिता काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम थंडबस्त्यात असल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाचे डुकरांच्या हैदोसाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.

शाळा आवारात जनावरांचा वावर

आलापल्ली : अहेरी पंचायत समितीअंतर्गत दुर्गम गावातील जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना अद्यापही पक्क्या स्वरूपाची संरक्षक भिंत उभारण्यात आली नाही. तसेच अनेक शाळांना प्रवेशद्वार उभारले नाही. परिणामी, गावातील मोकाट जनावरे शाळा परिसरात जाऊन हैदोस घालीत आहेत.

कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करा

आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी हाेत आहे.

हेमाडपंती शिव मंदिर जीर्णावस्थेत

गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिव मंदिर आहे. सदर मंदिर हेमाडपंती आहे. या मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. सदर मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते, असे सांगितले जाते. या मंदिरातून भुयार जात असून ते भुयार वैरागड येथील किल्ल्यामध्ये निघते, अशी आख्यायिका आहे.

झुडपी जंगल शेतीसाठी उपलब्ध करा

गडचिरोली : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये झुडपी जंगल आहे. सदर जंगल शेतकऱ्यांना शेतजमिनीसाठी उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. वाढत्या लोकसंख्येबरोबरच जमिनीचे तुकडेही वाढत चालले आहेत.

पोर्ला बसस्थानकावर गतिरोधकाची गरज

गडचिरोली : तालुक्यातील तसेच गडचिरोली-आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथील बसस्थानकात नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वेगात वाहने नेतात. त्यामुळे येथे गतिरोधक उभारावे, अशी मागणी होत आहे.

आवश्यकतेच्या ठिकाणी विद्युत खांब द्या

धानोरा : तालुक्यातील चव्हेला, मुंगनेर येथे वाढीव विद्युत खांब लावून वीजपुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. परंतु, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले.

Web Title: Provide Niradhar Yojana grants regularly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.